सिल्लोड : तालुक्यातील खवले मांजर तस्करी प्रकरणाने वेगळी कलाटणी घेतली आहे. चार कोटीत खवल्या मांजराची तस्करी करणारे आरोपी जामिनावर सुटल्याने वनविभागाच्या तपासावर विरजण पडले आहे. त्यामुळे ‘त्या’ नऊ आरोपींना वनकोठडी मिळावी म्हणून वनविभागाने सोमवारी सिल्लोड न्यायालयाला विनंती अर्ज सादर केला आहे. सिल्लोड न्यायालयाने या प्रकरणी ‘से’ मागितला आहे.
३ मार्चला सिल्लोड वनविभागाने खवले मांजराची तस्करी करणाऱ्या नऊ जणांना पकडले होते. या सर्व आरोपींना ४ मार्चला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने काही अटी व शर्थीवर त्यांना जामीन मंजूर केला. जामीन मिळताच सर्व आरोपी भूमिगत झाले. ते वनविभागाला तपासात मदत करत नाही. उलट ते पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे तपास करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आरोपींना पुन्हा ताब्यात घेण्यासाठी वनविभागाने सिल्लोड न्यायालयात धाव घेतली. आरोपींना फॉरेस्ट कस्टडी देण्याची विनंती केली आहे, अशी माहिती तपास अधिकारी तथा सिल्लोडचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भिसे यांनी दिली.
फोटो : सिल्लोड वनविभागामार्फत अजिंठा डोंगर रांगात खवल्या मांजराला सोडण्यात आले.