छत्रपती संभाजीनगर : शहरातील ॲम्बेसिडर हॉटेलच्या नावाने बनावट वेबसाईट तयार करून त्यावर ग्राहकांच्या बुकिंग घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. ग्राहक प्रत्यक्ष हॉटेलमध्ये पोहचल्यानंतर त्याची बुकींगच नसल्याचे समोर आले. त्यामुळे हॉटेल प्रशासनाने सिडको पोलिस ठाण्यात धाव घेत बनावट वेबसाईट तयार करणाऱ्याच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे.
ॲम्बेसिडर हॉटेलचे व्यवस्थापक प्रदीप माहेश्वरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ८ एप्रिल रोजी राहुल रामटेके यांनी हॉटेलमध्ये ऑनलाइन रुम बुक केली. त्यानंतर ते हॉटेलमध्ये आले. तेथे त्यांनी हॉटेलमध्ये ऑनलाइन रुम बुक करून बँक खात्यातून आगोदर ५ हजार ६८० आणि नंतर २९ हजार २३६ रुपये भरल्याचे सांगितले. तेव्हा हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी www.ambassadorindia.com या वेबसाईटवर जाऊन त्यांच्या नावाने रुम बुक आहे का, हे तपासले. त्यात राहुल रामटेके नावाने रुम बुक नसल्याचे आढळले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी रामटेके यांना तशी माहिती देत आपण कोणत्या वेबसाईटवर रुम बुक केली, याची माहिती विचारली. तेव्हा रामटेके यांनी ambassadorajantahotels.on.drv.tw या वेबसाईटवर ऑनलाइन बुकींग करून रक्कम भरल्याचे सांगितले.
दरम्यान, २३ एप्रिल रोजी एस. ई. ए. हाश्मी हे ग्राहक म्हणून हॉटेलमध्ये आले. त्यांनीही ऑनलाइन बुकींग करून ४ हजार ६३ रुपये भरल्याचे सांगितले. मात्र, त्यांच्या नावानेही हॉटेलमध्ये रुम बुक नसल्याचे आढळले. त्यानंतर सायबर भामट्याने ऑम्बेसिडर हॉटेलच्या नावाने मिळती-जुळती वेबसाईट बनवून ग्राहकांची बुकींग घेत फसवणूक सुरु केल्याचे लक्षात येताच सिडको ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. अधिक तपास पोलिस निरीक्षक संभाजी पवार करीत आहेत.