शिवना (औरंगाबाद) : मापात पाप करून क्विंटलमागे तब्बल सहा किलो कापूस लुटणाऱ्या एका खासगी व्यापाऱ्याकडील मापाड्याचा डाव शेतकऱ्यांनी उधळून टाकला. मंगळवारी (दि. २१) दुपारी याबाबत व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकारामुळे शिवना परिसरात खळबळ उडाली होती. शिवन्यापासून जवळ असलेल्या आडगाव भोंबे व दहिगाव येथे हा प्रकार घडला आहे. कापसाला आधीच भाव कमी, त्यात व्यापाऱ्यांची ही मनमानी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे.
शिवना येथून जवळच असलेल्या दहिगाव येथे अजिंठा येथील एका खासगी व्यापाऱ्याकडून मंगळवारी कापूस खरेदी सुरू होती. अंदाजापेक्षा कमी वजन भरत असल्यामुळे नारायण उमाजी गावंडे या शेतकऱ्यास मापात पाप होत असल्याचा अंदाज आला. त्यानंतर स्वतः गावंडे यांनी एक वजन काटा केला, त्यात तब्बल क्विंटलमागे सहा किलोची तफावत आढळून आली. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी मापाड्यास घेराव घातला. या प्रकरणानंतर व्यापाऱ्यांनी गावंडे यांना पूर्ण मोबदला परत केला. परंतु मंगळवारी दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
कापसाचा भावही वाढेनासुरुवातीला तब्बल ९ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल एवढा भाव शेतकऱ्यांना मिळाला होता. त्यानंतर आणखी भाव वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवून ठेवला आहे. मात्र, भाव कमी होत असल्याचे शेतकरी हवालदिल झाले आहेत. सध्या ७८०० ते ८००० असा भाव मिळत आहे. शिवाय साठवलेल्या कापसात पिसूंचे प्रमाण वाढले असून, त्यामुळे अंगावर पुरळ येण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे शेतकरी कापूस विक्री काढत आहेत. त्यात व्यापाऱ्यांकडून मापात पाप होत असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.