लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : भूमिगत गटार योजनेच्या घोटाळ्याचा लेखाजोखा १४ एमबी (मेजरबुक) मध्ये दडलेला आहे. ४ मेजरबुकमध्ये योजनेच्या कामावर घोटाळा झाल्याचे शिक्कामोर्तब करण्यात आले असले तरी उर्वरित १० मेजरबुकच्या चौकशीनंतर योजनेच्या कामाचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.भूमिगतच्या बिलांचे १४ पैकी ४ मेजरबुक आर्थिक लेखापरीक्षण करताना तपासले. त्यात योजनेच्या कामात घोटाळा झाल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. उर्वरित १० मेजरबुकच्या चौकशीतून योजनेतील अफरातफर समोर येणार आहे.गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत भाजप नगरसेवक राजगौरव वानखेडे यांनी योजनेच्या कामावरून प्रश्न उपस्थित करून याबाबत आयुक्त डी. एम. मुगळीकर यांच्या उपस्थितीत स्वतंत्र बैठक घेण्याची मागणी केली. प्रकल्प व्यवस्थापन समिती फोरट्रेसचे प्रतिनिधी व अधिकाºयांना या बैठकीला बोलवावे. योजनेच्या कामात अनियमितता, आर्थिक घोटाळा झाला आहे. मुख्य लेखापरीक्षक दीपाराणी देवतराज यांनी सादर केलेल्या फायनान्शियल आॅडिटमधून घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. अजून दहा मेजरबुक तपासणे बाकी आहे. त्यातून खळबळजनक माहिती बाहेर येण्याची शक्यता आहे. ते मेजरबुक लवकर तपासण्याची मागणी वानखेडे यांनी केली. नगरसेवकांच्या मागणीवरून सभापती गजानन बारवाल यांनी भूमिगतच्या बिलांच्या सर्व एमबी तपासून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य लेखापरीक्षकांना दिले होते. मुख्य लेखापरीक्षकांनी सभापती, आयुक्तांकडे भूमिगतच्या फायनान्शियल आॅडिटचा अहवाल सादर केला आहे. त्या अहवालात २५ आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. अहवालात बिल वाटपासह कामात १६९ त्रुटींवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. फायनान्शियल आॅडिट करताना संबंधित विभागाने सहकार्य केले नसल्याचे अहवालात नमूद आहे. त्यावरून सभापती बारवाल यांनी प्रभारी कार्यकारी अभियंता अफसर सिद्दीकी यांना फैलावर घेतले. मुख्य लेखापरीक्षकांना सहकार्य करण्याचे आदेश सभापतींनी दिले.
‘भूमिगत’चा पर्दाफाश फक्त १० पावलं दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 12:50 AM