बीड रक्तसंकलनात अग्रस्थानी असलेल्या बीड जिल्हा रुग्णालयात रक्तपेढीमध्ये सध्या रक्तपिशव्यांचा तुटवडा जाणवत आहे. रुग्णांना रक्तपिशवी मिळविण्यासाठी नातेवाईकांना जिल्हा रुग्णालयात चकरा माराव्या लागतात. थॅलेसेमियाच्या १५० बालरुग्णांना रक्त आणायचे कुठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे.३१० खाटांच्या जिल्हा रुग्णालयात ५०० पेक्षा अधिक रुग्ण दिवसाकाठी उपचारासाठी दाखल होत असतात. यामध्ये प्रसूतीसाठी आलेल्या महिलांनादेखील रक्ताची आवश्यकता भासते. दिवसाकाठी ५०-६० रक्तपिशव्यांची मागणी आहे; आवक मात्र मागणीच्या १ टक्काही नसल्याने रक्तपिशव्यांचा मोठा पेच जिल्हा रुग्णालय प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. जिल्हा रुग्णालयात रक्त मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना खासगी रक्तपेढ्यांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. रक्तपिशव्या मागणी करणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तदान करण्याचे बंधनकारक करण्याची वेळ आली आहे. मागील आठ दिवसांत रक्तदान शिबिरांची संख्या कमी झाल्याने रक्तपिशव्यांचा तुटवडा भासत आहे. जिल्ह्यातील सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत जिल्हा रुग्णालयात येऊन अथवा रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्तदान करण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश चव्हाण यांनी शुक्रवारी केले.
दवाखान्यात रक्तपिशव्यांचा तुटवडा
By admin | Published: April 29, 2017 12:36 AM