छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात ९ ते ११ एप्रिल दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे २९२ शेतकऱ्यांचे १६३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. एकीकडे टंचाई तर दुसरीकडे अवकाळी संकट अशी परिस्थिती सध्या जिल्ह्यात आहे. बागायत पिकांचे तीन दिवसांत सर्वाधिक नुकसान झाले, तर ३ जनावरांचा मृत्यू झाला. सहा मालमत्तांचे कमी-अधिक प्रमाणात पावसामुळे नुकसान झाले आहे. सिल्लोड तालुक्याला अवकाळीचा सर्वाधिक फटका बसला. त्यानंतर कन्नड तालुक्यातील काही गावांमध्ये नुकसान झाले. जिल्ह्यात २.१ मि. मी. अवकाळी पावसाची नोंद झाली.
दरम्यान, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी शुक्रवारी टंचाईचा आढावा घेतला. जिल्ह्यातील प्रकल्पांत उपलब्ध पाणीसाठा, अधिग्रहित विहिरी, लाभक्षेत्रातील विहिरींच्या अधिग्रहणाबाबत भूजल अधिनियमातील तरतुदी तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियमातील तरतुदींना अनुसरून प्रस्ताव पाठवावे. पाण्याचा अतिरिक्त वापर थांबवावा, असे आदेश त्यांनी दिले.
टँकरने पाणीपुरवठा करताना टँकरला जीपीएस लावण्यात यावे. टँकरच्या फेऱ्यांचे नियोजन करावे. त्याचे गावात रजिस्टर ठेवून त्यावर गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घ्याव्या. लॉगबुक तयार करावे. टँकरच्या फेऱ्या व टँकर भरण्याचे ठिकाण याठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करावी. जिल्ह्यात टंचाई उपाययोजना राबवताना जलपुनर्भरण, गाळ काढणे अशी कामे प्राधान्याने घ्यावी. जेणेकरून पुढील वर्षात टंचाई निर्माण होणार नाही, अशा सूचना त्यांनी केल्या. जिल्ह्यातील चारा बाहेर नेऊ नये, असे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत. जिल्ह्यातील चाऱ्याची बाहेर वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास तसे पोलिसांना कळवावे. पशुधनासाठीही पिण्याच्या पाण्याची सोय करावी, असे ते बैठकीत म्हणाले.