- मोबीन खान
वैजापुर (औरंगाबाद ) : सलग चार वर्षांपासून टंचाईच्या सर्वाधिक झळा सहन करणाऱ्या वैजापुर तालुक्यातील गावांना यंदा परतीच्या पावसामुळे चांगला दिलासा मिळाला. तरीही गतवर्षीचा अनुभव लक्षात घेता तालुका प्रशासनाने जानेवारी २०१८ ते मार्च २०१८ या कालावधीसाठी १ कोटी ८७ लाख रुपयांचा कृती आराखडा तयार केला आहे.
वैजापुर तालुक्यात १५५ टँकरद्वारे गतवर्षी पाणीपुरवठा करण्यात आला होता. परतीचा पाऊस चांगला झाल्यामुळे अनेक गावातील विंधन विहिरी, विहिरीला पाणी आहे़ याशिवाय गोदावरी नदीकाठच्या गावांनाही नदीपात्रात पाणी असल्यामुळे चांगलाच दिलासा मिळाला आहे़ अद्याप तालुक्यातून पाणीटंचाईसाठी बाबतारा या एकाच ग्रामपंचायतीचा प्रस्ताव पंचायत समितीकडे आलेला आहे. तरीही खबरदारी म्हणून प्रशासनाने कृती आराखडा तयार करून मंजूरीसाठी पाठवला असल्याचे गटविकास अधिकारी पुष्पा पंजाबी यांनी सांगितले़. तालुक्यात दरवर्षीच 'लेट लतीफ' अधिकारी मंडळी पाणीटंचाई आराखडा तयार करण्याची लगबग जानेवारी अखेर दाखवायचे. त्यामुळे हा आराखडा मंजूर होण्यास फेब्रुवारीच उजाडायचा. यंदा हा कृती आराखडा गटविकास अधिकारी पुष्पा पंजाबी यांनी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तयार करुन मंजूरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठवल्याने त्याची अंमलबजावणीही त्याच गतीने होणे अपेक्षित आहे.
शेवटच्या टप्प्यात झालेल्या पर्जन्यामुळे टंचाईचा काळ लांबला असला तरी यंदा अल्पपर्जन्यामुळे टंचाईच्या झळा लवकर बसण्याची भीती आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत १८७.०४ कोटींच्या १९३ उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. यात २३ गावांतील नळयोजनेच्या दुरुस्तीचा ६९.०० लाखांचा प्रस्ताव आहे. ५८ गावांत ७१.०० लाखांच्या १४२ नवीन विंधन विहिरींचा प्रस्तावही आराखड्यात आहे. ८ गावांसाठी १४ विहीर-बोअर अधिग्रहणासाठी ५.०४ लाखांचे प्रस्तावित केले आहेत.तर ८ गावांसाठी १४ टँकरला ४२.०० लाख प्रस्तावित केले आहेत.