- बापू सोळुंकेऔरंगाबाद : पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडल्याने जायकवाडी धरण १०० टक्के भरले आहे. यामुळे रब्बी हंगामासाठी तीन आणि उन्हाळी पिकासाठी पाच ते सहा आवर्तने देण्याचा निर्णय जलसंपदा विभागाच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत नुकताच घेण्यात आला. या बैठकीत पाणी सोडण्याचे वेळापत्रकही निश्चित केले असून, पहिले आवर्तन सुरूही झाले आहे.
जायकवाडी धरणाच्या उर्ध्वक्षेत्रात पावसाळ्यात जोरदार पाऊस पडला. यामुळे ऑक्टोबर महिन्यातच जायकवाडी धरण भरले होते. जायकवाडी धरणात सतत पाण्याची आवक सुरू होती, यामुळे अनेकवेळा पाण्याचा विसर्गही करावा लागला होता. जायकवाडी धरण काठोकाठ भरल्याने यंदा रब्बी आणि उन्हाळी हंगामातील पिकांसाठी हवे तेवढे पाणी सोडणे शक्य होणार आहे. पाणी वितरणासंबंधी नुकतीच जलसंपदा विभागाच्या गोदावरी पाटबंधारे लाभक्षेत्र विकास प्राधिकरण(कडा)चे मुख्य अभियंता जयंत गवळी यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत उपलब्ध जलसाठा, सिंचन, एमआयडीसी आणि पिण्याच्या पाण्याच्या मागणीचा विचार करून पाणीवाटपाचे नियोजन करण्यात आले.
जायकवाडी धरणातून रब्बीसाठी तीन तर उन्हाळी पिकांसाठी पाच किंवा सहा आवर्तने देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कडाचे अधीक्षक अभियंता सब्बीनवार यांनी दिली. ते म्हणाले, ग्रामपंचायत आचारसंहितेमुळे या बैठकीला पालकमंत्री आणि विभागातील लोकप्रतिनिधींना बोलावता आले नाही. मात्र, रब्बी हंगामासाठी तातडीने पाणी सोडणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन बैठक घेण्यात आली. या बैठकीत पाणीवाटपाचे वेळापत्रकही निश्चित करण्यात आले. यानुसार रब्बी हंगामातील पिकासाठी तीन आवर्तने देण्याचा निर्णय झाला आहे. पहिले आवर्तन देण्यास सुरुवात झाली. उन्हाळी पिकासाठी पाच आवर्तने देण्यात येणार आहेत.
जायकवाडीमुळे सुमारे १ लाख ८० हजार हेक्टरवर जमीन सिंचनाखालीजायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून १ लाख ४० हजार हेक्टर तर उजव्या कालव्याद्वारे ४० हजार हेक्टरवरील जमीन ओलिताखाली आली आहे. तसेच धरण परिसरातील शेतकरी मोटारपंप टाकून शेतीसाठी पाणी नेतात. यासोबत ४० ग्रामपंचायती तसेच औरंगाबाद, जालना शहरांसह एमआयडीसीतील उद्योगांना पाणीपुरवठा होतो.
आवर्तनाचे वेळापत्रकरब्बी हंगाम (डावा कालवा)आवर्तन क्रमांक १ - १८ नोव्हेंबर ते १६ डिसेंबरआवर्तन २ - १८ डिसेंबर ते १६ जानेवारीआवर्तन ३ - १८ जानेवारी ते २८ फेब्रुवारी
(उजवा कालवा)आवर्तन १ - २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबरआवर्तन २ - २५ डिसेंबर ते १० जानेवारी २०२३आवर्तन ३ - १५ जानेवारी ते ३१ जानेवारीआवर्तन ४ - १० फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२३
उन्हाळी हंगामडावा कालवाआवर्तन १ - १ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३आवर्तन २ - २६ मार्च ते १८ एप्रिलआवर्तन ३ - १९ एप्रिल ते १२ मेआवर्तन ४ - १३ मे ते ५ जूनआवर्तन ५ - ६ जून ते ३० जून
उजवा कालवाआवर्तन क्रमांक १ - १ मार्च २०२३ ते २२ मार्चआवर्तन २ - १ एप्रिल ते २४ एप्रिलआवर्तन ३ - १ मे ते २० मेआवर्तन ४ - २५ मे ते १० जूनआवर्तन ५ - १५ जून ते ३० जून