छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांच्या लॉगीनवर सुमारे २२ हजार विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज पडून आहेत. मुदत संपली तरीही हे अर्ज समाज कल्याण कार्यालयाकडे फॉरवर्ड करण्याचा विसर महाविद्यालयांना पडला आहे. त्यामुळे आता या कार्यालयाने आक्रमक भूमिका घेतली असून, शनिवारी (दि. २०) सायंकाळपर्यंत अर्ज फॉरवर्ड करावे लागणार आहेत. याशिवाय लॉगीनवर अर्ज प्रलंबित का राहिले? याचा खुलासाही महाविद्यालयांना सादर करावा लागणार आहे.
व्यावसायिक व पारंपरिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयीन मागासवर्गीय विद्यार्थ्यांना भारत सरकारची शिष्यवृत्ती दिली जाते. चालू शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांसाठी ११ ऑक्टोबरपासून शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे महाडीबीटी पोर्टल सुरू झाले. तेव्हापासून महाविद्यालयांच्या लॉगीनवर प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्जांची छाननी करून परिपूर्ण अर्ज समाज कल्याण कार्यालयाकडे फॉरवर्ड करण्याची मुदत ५ जानेवारीपर्यंत देण्यात आली होती. मात्र, अनेक महाविद्यालयांनी त्याकडे गांभीर्याने बघितले नसल्याची बाब समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त पी. जी. वाबळे यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली असून, १९ जानेवारी रोजी शनिवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत महाविद्यालयांच्या लॉगीनवर असलेल्या अर्जांची छाननी करून परिपूर्ण अर्ज समाज कल्याण कार्यालयाकडे फॉरवर्ड करावेत, असे एका परिपत्रकाद्वारे सूचित केल्यामुळे महाविद्यालयांची धांदल उडाली आहे. एवढेच नाही, तर आपल्या लॉगीनवर अर्ज का पडून होते, याबाबत दोन दिवसांत खुलासाही सादर करावा लागणार आहे. ज्या महाविद्यालयांकडून खुलासा येणार नाही, त्यांची मान्यता काढण्यासाठी वरिष्ठस्तरावर शिफारस करण्यात येणार आहे.
प्रलंबित अर्जांची स्थितीमहाविद्यालयांच्या लॉगीनवर मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे भारत सरकारची शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्काचे नवीन व नूतनीकरण अर्ज पडून आहेत. त्यात अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे ११ हजार ३४४ अर्ज, विमुक्त जाती, जमातीचे ४ हजार ५६०, ओबीसी प्रवर्ग ४ हजार ८६०, विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांच्या १ हजार ७१० अर्जांचा समावेश आहे.