- साहेबराव हिवराळे
औरंगाबाद : दरवर्षी शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला आॅगस्ट महिन्यात शिष्यवृत्तीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जाती, जमातीच्या इतर लाभार्थ्यांना भारत सरकारची शिष्यवृत्ती आॅनलाईन विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा व्हावी म्हणून आॅनलाईन व्यवस्था केली आहे; परंतु सरकारी यंत्रणेकडून ही वेबसाईटच अद्याप सुरू केलेली नाही. त्यामुळे यंदाही विद्यार्थ्यांना दिवाळीपूर्व शिष्यवृत्ती मिळण्याची अपेक्षा दुरावली आहे.
शैक्षणिक सत्राच्या पहिल्या टप्प्यात शिष्यवृत्तीचे अर्ज दाखल करण्यासाठी महाविद्यालयात गर्दी असते, लाभार्थी विद्यार्थी महाविद्यालयातील कार्यालयात जाऊन दररोज विचारणा करीत असले तरी त्यांना अद्याप आॅनलाईन व्यवस्था सुरूच झालेली नाही. वेबसाईट सुरू झाल्यावर अर्ज भरता येणार आहेत, अशा सूचना केल्या जात आहेत. अनेक विद्यार्थी पालक व सामाजिक न्याय भवनात गतवर्षीच्या शिष्यवृत्ती व यंदाचे अर्ज सादर करण्याविषयी विचारपूस करताना दिसत आहेत.
विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर महाविद्यालयातून काही गैरप्रकार होऊ नये म्हणून हे पाऊल उचलले असले तरी विद्यार्थ्यांची परवड मात्र अद्याप थांबलेली नाही. गतवर्षीच्या शिष्यवृत्तीचा घोळ संपलेला नसल्याने यंदा शिष्यवृत्तीधारकांनी आॅनलाईन अर्ज भरावे कधी आणि त्यांच्या खात्यात शिष्यवृत्ती येणार केव्हा, असा प्रश्न अनेक पालकांनी उपस्थित केला.
ग्रामीण विद्यार्थ्यांची गैरसोय ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत असल्यामुळे आॅनलाईन अर्जाची वेबसाईट सुरू करावी, अशी मागणी भाऊसाहेब नवगिरे यांनी केली आहे.
प्रत्यक्ष अर्ज की आॅनलाईन ठरवा गतवर्षीच्या विद्यार्थ्यांचे आॅनलाईन अर्ज भरून घेतले, त्यानंतरही प्रत्यक्ष अर्ज भरून घेतले या प्रक्रियेत ओबीसी, व्हीजेएनटीचे विद्यार्थी वंचित आहेत. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचीही फक्त ७० टक्केच शिष्यवृत्ती टाकून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय केली जात आहे. श्ौक्षणिक सत्रातील सप्टेंबरचा शेवटचा आठवडा सुरू असून, सामाजिक न्याय विभागाने दक्षता घेऊन पोर्टल त्वरित सुरू करून आॅनलाईन अर्ज भरून घ्यावे अन्यथा आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राहुल तायडे यांनी दिला. काही निवडक कॉलेजात आॅनलाईचा प्रयोग केला असून, रिपार्ट आल्यावर लवकरच आॅनलाईन सुरू होणार आहे, असे समाजकल्याण शिष्यवृत्ती विभागातील अधिकारी एस.एस. दडपे म्हणाले.