औरंगाबाद : प्रवेश आरटीईतून असला तरी शाळांकडून शुल्काची मागणी आणि पहिली ते आठवीपर्यंत प्रवेश असताना चौथीपुढील वर्गांसाठी प्रवेशासाठी शुल्क मागणी होत असल्याच्या तक्रारी घेऊन पालक शिक्षण विभाग गाठत आहे, तर प्राथमिक आणि माध्यमिक शाळा व्यवस्थापन वेगवेगळे कारण सांगून शुल्क मागणी करीत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. आपल्या पाल्यांना शाळेकडून त्रास नको म्हणून नाव घेऊ नका, आमची अडचण सोडवा, अशी विनवणी पालकांकडून करण्यात येत आहे.
मोफत आणि सक्तीचा शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश देण्यात येतो. २०१९-२० शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी लकी ड्रॉ कोरोनामुळे ऑनलाईन झाला होता. प्रवेश दिलेल्या काही इंग्रजी शाळांमध्ये ऑनलाईन प्रवेशानंतर आरटीईचे प्रवेश पहिली ते चौथीपर्यंत असल्याचे दर्शविल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे केल्या, तर काही शाळांमधून आरटीई प्रवेश असतानादेखील शुल्क आकारणी केली जात असल्याच्या तक्रारी पालकांकडून होत आहेत. याशिवाय यावर्षीही अनेक नामांकित शाळा आरटीई प्रवेश प्रक्रियेत सहभागी झाल्या नाहीत. त्या शाळा अल्पसंख्याक दर्जा मिळवून या प्रक्रियेतून बाहेर असल्याचा आरोप आरटीई पालक संघटनेने केला आहे.
आरटीईचा प्रवेश पहिली ते आठवीपर्यंत
या संदर्भात शिक्षण विभागात विचारणा केली असता, आरटीई प्रवेश समन्वयक म्हणाले, पहिली ते चौथी आणि पाचवी ते दहावी असे दोन शाळेत दोन व्यवस्थापन असणाऱ्या शाळांमध्येच अशा तक्रारी दिसून आल्या आहेत. मात्र, आरटीई प्रवेश वर्ग १ ते वर्ग ८ पर्यंत असल्याने व्यवस्थापन दोन असले तरी त्या शाळा आरटीई प्रवेशाच्या चौथीनंतरच्या वर्गासाठी शुल्क मागू शकत नाही.