औरंगाबाद : आरटीओ कार्यालयाने १०६ स्कूलबसचे परवाने चार महिन्यांसाठी निलंबित केले आहेत. या कारवाईनंतरही बसमालकांनी आरटीओ कार्यालयाकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे या बस रस्त्यावर धावत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातून अपघाताला आमंत्रण मिळत असल्याने त्या ओढून आणण्याची कारवाई आरटीओ कार्यालय करणार आहे.
एका स्कूलबसचे रस्त्यातच ब्रेक नादुरुस्त झाल्याची घटना सोमवारी आडूळजवळ घडली. यामध्ये चालकाच्या समयसूचकतेने २२ विद्यार्थी बालंबाल बचावले. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी महाराष्ट्र स्कूल बस अधिनियमनानुसार नियमांची पूर्तता करणे आवश्यक आहे; परंतु अनेक स्कूल बसमधून विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक होत नसल्याचा प्रकार १०६ स्कूल बसच्या परवाने निलंबनाच्या कारवाईमुळे समोर आला आहे. फिटनेससह इतर आवश्यक बाबी नसल्याने या बस रस्त्यावर चालविणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे आरटीओ कार्यालयाकडून तपासणी करून घेऊन आवश्यक त्या गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक आहे; परंतु या स्कूल बसचालकांनी त्यास ठेंगा दाखविला आहे. परवाने निलंबन केल्यानंतरही या स्कूल बसचालकांनी ‘आरटीओ’ कार्यालयाची पायरी चढली नाही. आरटीओ कार्यालयाच्या पथकाला या बस रस्त्यावर सापडतदेखील नाही.
बस रस्त्यावर दिसल्यास जप्त करणारपरवाने निलंबित केलेल्या बस रस्त्यावर दिसल्यावर जप्त केल्या जाणार आहेत. त्यासोबतच संबंधित पत्त्यावर जाऊनही ओढून आणल्या जातील. जर वाहन चालविण्याच्या अवस्थेत नसेल, तर जागेवरच लॉक केले जाईल, असे प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रमेशचंद्र खराडे यांनी सांगितले.
कर्मचारी संख्या अपुरीआरटीओ कार्यालयाच्या पथकांना रस्त्यावर स्कूल बस सापडत नाहीत. त्यामुळे शाळांबरोबर करार संपल्याने, नादुरुस्तीसह अन्य कारणांमुळे परवाने निलंबित केलेल्या स्कूल बस रस्त्यावर चालत नसल्याचा अजब अंदाज वर्तविण्यात येत आहे. आरटीओ कार्यालयात या बसचे मालक कोण आहेत, पत्ता आदी माहितीची नोंद आहे. त्यावरून बस जप्तीची कारवाई होऊ शकते. परंतु कर्मचारी संख्या अपुरी असल्याचे कारण पुढे करून लवकरच जप्तीची कारवाई केली जाईल, असे आरटीओ अधिकार्यांनी सांगितले.