- गजानन दिवाण
औरंगाबाद : स्वीडनमधील ग्रेटा थनबर्ग या मुलीच्या ‘फ्रायडे फॉर फ्यूचर’च्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्रातील अनेक शाळकरी मुलांनी शुक्रवारी रॅली काढून पर्यावरणाचा जागर केला. या वेळी मुलांना पर्यावरणाची शपथही देण्यात आली. या सात दिवसांच्या जागरात पहिल्याच दिवशी मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि कोल्हापुरात अनेक शाळांनी सहभाग नोंदविला. हवामान बदलाच्या संकटाला गांभीर्याने न घेणाऱ्या प्रत्येकाने जागे व्हावे, अशी हाक या विद्यार्थ्यांनी दिली.
पृथ्वीची विनाशाकडे होत असलेली वाटचाल रोखण्यासाठी काही तरी करा, अशी साद ग्रेटा थनबर्ग या मुलीने आॅगस्ट २०१८ मध्ये स्विडनमधून घातली. तिचे हे आंदोलन आता जगभर पसरले असून, २० सप्टेंबरपासून सात दिवस विविध देशांमध्ये ‘फ्रायडे फॉर फ्यूचर’चा जागर केला जाणार आहे. महाराष्ट्रात सर्वप्रथम मुंबईत १५ मार्च २०१९ ला निखिल काळमेघ या महाविद्यालयीन तरुणाने या आंदोलनाची सुरुवात केली. आज या ग्रुपमध्ये राज्यातील विविध भागांतील हजारो तरुण सहभागी झाले असल्याचे निखिलने ‘लोकमत’ला सांगितले. ‘फ्रायडे फॉर फ्यूचर’ सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी मुंबईतील मालाड, गोवंडी, गोरेगाव, विक्रोळी, चुरणी रोड, माटुंगा परिसरातील १७ शाळा आणि महाविद्यालयांनी सहभाग घेतला असल्याची माहिती निखिलने दिली. शुक्रवारी आयोजित कार्यशाळेत मुंबईतील पाच शाळांमधील ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
कोल्हापुरात राजर्षी शाहू हायस्कूल, शिवाजी मराठा हायस्कूल, आदर्श प्रशाला, देशमुख हायस्कूल, माझी शाळा आदी सहा शाळांनी ‘फ्रायडे फॉर फ्यूचर’मध्ये सहभाग घेतल्याची माहिती नितीन डोईफोडे याने दिली. पुण्यात सिम्बॉयसिस इंग्लिश स्कूल आणि अक्षरनंदन या दोन शाळांनी सहभाग घेतला. शनिवारी सायंकाळी पुण्यात तरुणांची मोठी रॅली काढली जाणार असल्याचे शुभम हाळ्ळे याने सांगितले. सात दिवसांच्या जागरानंतर पर्यावरण तज्ज्ञांशी चर्चा करून पुढील दिशा ठरविली जाणार आहे. हवामान बदलाचे संकट राजकारण्यांपासून प्रशासन आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे यासाठी हा जागर केला जात आहे. राज्यातील प्रत्येक शाळेने आणि महाविद्यालयाने या मोहिमेत स्वत:च्या भविष्यासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन निखिलने केले आहे.
>सांगलीत मंगळवारी दिली जाणार शपथसांगली जिल्ह्यात ‘फ्रायडे फॉर फ्यूचर’ मोहिमचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. शाळांमध्ये मंगळवारी (२४ सप्टेंबर), तर महाविद्यालयांत २७ सप्टेंबर रोजी रॅली काढून विद्यार्थ्यांना पर्यावरणाची शपथ दिली जाणार असल्याची माहिती डॉ. रवींद्र व्होरा यांनी ‘लोकमत’ला दिली. सात विद्यार्थ्यांचे पर्यावरणाशी संबंधित विविध विषयांवर रेकॉर्डिंग करण्यात आले असून, रविवारी सांगली जिल्ह्यात ते एफएमवरून प्रसारित केले जाणार आहे. शिवाय काव्यवाचनदेखील होणार असल्याचे व्होरा यांनी सांगितले.
>औरंगाबादेतही शपथऔरंगाबादेत एसएफआय आणि लोक पर्यावरण मंच यांच्या संयुक्त विद्यमाने पैठण गेट येथे पर्यावरण संवर्धनाची शपथ घेण्यात आली. लोक पर्यावरण मंचतर्फे ५ जून रोजी याच विषयावर मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी २००-२२५ शाळकरी विद्यार्थ्यांनी या साखळीत सहभाग घेतला होता, अशी माहिती ऋषिकेश पवार यांनी दिली.