औरंगाबाद : खाजगी शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी अंमलात आणल्या जाणाऱ्या ‘पवित्र पोर्टल’ला आमचा विरोध नाही; पण केवळ लेखी परीक्षेनुसार शिक्षक भरती न करता परीक्षेत सर्वश्रेष्ठ ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखतीही घ्याव्यात, अशी आमची मागणी असल्याचे सांगून शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील म्हणाले की, मागील चार वर्षांत महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी शिक्षणमंत्र्यांनी प्रतिसाद दिला नाही, या निषेधार्थ २ नोव्हेंबर रोजी राज्यभरातील खाजगी शाळा बंदची हाक देण्यात आली आहे.
यासंदर्भात महामंडळाचे मराठवाडाध्यक्ष मिलिंद पाटील, सचिव एस. पी. जवळकर, वाल्मीक सुरासे, मिर्झा सलीम बेग, अनिकेत पाटील आदींच्या उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेत विजय नवल पाटील म्हणाले की, विद्यमान सरकारच्या काळात शिक्षण संस्थाचालकांना अनेक आर्थिक, प्रशासकीय अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर वाईट परिणाम करणाऱ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
शिक्षकेतर कर्मचारी भरतीसाठी नेमलेल्या समितीने शिफारशी केल्यानंतरही शासन सातत्याने त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. कनिष्ठ महाविद्यालयांची कार्योत्तर मान्यता नाकारली जाते. शिक्षण क्षेत्रात सातत्याने वेगवेगळे निर्णय लादून हे सरकार पैसे बचत करण्याचा विचार करते. अन्य क्षेत्रात पैशाची बचत करायची नाही. केवळ शिक्षण क्षेत्रातच तो निर्णय कशासाठी, असाही प्रश्न नवल पाटील यांनी उपस्थित केला. २० टक्के अनुदान पात्र शाळांना प्रचलित नियमानुसार १०० टक्के अनुदान देण्यात यावे, या व इतर मागण्यांसाठी २ नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व खाजगी शाळा बंद ठेवल्या जाणार आहेत.