लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक शाळेच्या प्रवेशद्वारासमोर तक्रारपेट्या बसविण्याच्या सूचना होत्या. शिक्षण विभागाकडून नियोजन केले असले तरी अद्याप याबाबत कार्यवाही झाली नाही. सदर पेट्यांचा अहवाल संबधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांना तत्काळ पाठविणे बंधनकारक होते. मात्र संबधित शाळा व्यवस्थापन यंत्रणा याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.शाळांतील वाढत्या गैरप्रकारामुळे विद्यार्थी, पालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाईट प्रवृत्तीला आळा बसावा व शालेय परिसरातील गुंडगिरी करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, यासाठी शिक्षण विभागातर्फे शाळांत तक्रारपेटी बसविणे बंधनकारक करण्यात आले. जिल्हाभरातील सर्व माध्यमाच्या व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेच्या दर्शनी भागात तक्रारपेट्या बसविण्याच्या सूचना आहेत. मात्र मोजक्याच शाळेत पेट्या बसविल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्याचा अहवालही शिक्षण दरबारी नाही. सदर तक्रारपेटी आठवड्यातील कामकाजाच्या शेवटच्या दिवशी उघडली जाईल. यावेळी संबधित मुख्याध्यापक, प्राचार्य, पोलीस प्रतिनीधी, पालक प्रतिनिधी व विद्यार्थ्यांसमक्ष उघडणे अनिवार्य आहे. विशेष म्हणजे गंभीर, संवेदनशील स्वरूपाच्या तक्रारींबाबत पोलिस यंत्रणेचे सहाय्य घेणे आवश्यक आहे. तक्रारींची नोंद व निवारण योग्य वेळेत करावे लागेल. अशावेळी तक्रारकर्त्यांचे नाव गुप्त ठेवले जाणार आहे. त्यांना कुठलाही त्रास होणार नाही, याबाबत दक्षताही संबधित यंत्रणेस घ्यावी लागेल.
शाळेत तक्रारपेट्या बसल्याच नाहीत
By admin | Published: July 11, 2017 11:45 PM