छत्रपती संभाजीनगर : आगामी शैक्षणिक वर्षातील सुट्यांचे वेळापत्रक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सोमवारी जाहीर केले. त्यानुसार १५ जूनपासून जिल्ह्यातील शाळांची घंटा वाजणार आहे. त्याचवेळी शाळांना २ मे पासून उन्हाळी सुट्या लागतील. याविषयीचे आदेश जि.प.चे मुख्य कार्यकारी विकास मीना यांच्या मंजुरीनंतर काढण्यात आले आहेत.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी १८ एप्रिल रोजी पत्र पाठवून उन्हाळी सुट्या, २०२४-२५ या नव्या शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रकाविषयी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार माध्यमिकचे शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख, प्राथमिकच्या जयश्री चव्हाण यांनी नवीन शैक्षणिक वर्षातील सुट्यांचे वेळापत्रक तयार केले. त्यास सीईओ विकास मीना यांनी मंजुरी दिली आहे. त्यानुसार २ मेपासून उन्हाळी सुट्या लागणार आहेत. त्यानंतर दीड महिन्यांनी १५ जून रोजीच शाळा उघडणार आहेत. तसेच दिवाळीच्या सुट्या २८ ऑक्टोंबर ते १४ नोव्हेंबर २०२४ दरम्यान असतील. १५ नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंतीमुळे सुटी असेल. त्यानंतर १६ नोव्हेंबरपासून दिवाळीनंतर शाळा सुरू होणार असल्याचेही वेळापत्रकात स्पष्ट केले आहे.
त्याशिवाय शासनाने निर्धारित केलेल्या २० सुट्या, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारातील ३ आणि मुख्याध्यापक स्तरावरील २ सुट्याही असणार आहेत. तसेच ज्या शाळांना गणेशोत्सव, नाताळ, रमजान, मोहरम सारख्या सणांना सुट्या घ्यावयाच्या असतील त्यांनी दिवाळीची सुटी कमी करून त्याऐवजी इतर सणांच्या तेवढ्याच कालावधीची सुटी समायोजनाने शालेय व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने जाहीर करावी. तसेच नागपंचमी, पोळा, राजमाता जिजाऊ जयंती आदी प्रसंगी स्थानिक मागणीप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने मुख्याध्यापक अधिकारातील सुटी जाहीर करण्याचा निर्णय घ्यावा, असेही आदेशात नमूद आहे.
सीबीएसई शाळांनाही हेच वेळापत्रक लागूशहरासह जिल्ह्यात असलेल्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (सीबीएसई) मान्यता असलेल्या शाळांनाही जि.प.च्या शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेले वेळापत्रक लागू करण्यात आलेले आहे. त्यामुळे सीबीएसईच्या शाळांनाही याच वेळापत्रकानुसार २ मे पासून उन्हाळी सुट्या असणार आहेत. तर १५ जून रोजी शाळा भरतील, अशी माहिती प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी दिली.