औरंगाबाद : मनपा शाळांसह खासगी अनुदानित, विनाअनुदानित माध्यमिक शाळांतील नववी-दहावीचे वर्ग येत्या ४ जानेवारीपासून सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार या शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ‘आरटीपीसीआर’ कोरोना चाचणी करण्याचे बंधनकारक करण्यात आले असून, त्याचा अहवाल ३ जानेवारीपर्यंत मुख्याध्यापकांनी सादर करावा, असे आदेश मनपा उपायुक्त सुमंत मोरे यांनी दिले.
पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यात आल्या आहेत, त्यानंतर महापालिका हद्दीतील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. २० नोव्हेंबरपर्यंत दिवाळी सणाच्या सुट्या होत्या; परंतु कोरोनामुळे मनपा हद्दीतील मनपा शाळांसह खासगी अनुदानित व विनाअनुदानित सर्व शाळा ३ जानेवारीपर्यंत बंद राहतील, असे शिक्षण विभागाने कळविले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने व्यवहार सुरळीत करण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. त्यासाठी कोरोनाचे पालन बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोनाचे नियम पाळूनच माध्यमिक विभागातील नववी-दहावीचे वर्ग येत्या ४ जानेवारीपासून सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. माध्यमिक विभागातील सर्व शाळा सुरू करण्यापूर्वी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आरटीपीसीआर कोरोना चाचणी करण्याचे बंधनकारक करण्यात आल्याचे महापालिकेतील उपायुक्त सुमंत मोरे यांनी सांगितले. यापूर्वी शाळा सुरू करण्यासाठी शिक्षकांची तपासणी केली असता त्यामध्ये शंभरपेक्षा अधिक शिक्षक पॉझिटिव्ह आढळून आले होते.
५० टक्के पालकांनी दिली संमती
महापालिका हद्दीतील माध्यमिक विभागाच्या नववी-दहावीचे वर्ग सोमवारपासून सुरू होणार आहेत. त्याकरिता या वर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमतीपत्र घेण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार ५० टक्के पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास संमती दिली आहे.