औरंगाबाद : प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवशी २७ जानेवारीपासून जिल्ह्यातील सर्व इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याच्या सूचना माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांनी शाळाप्रमुखांंना दिल्या आहेत.
कोरोनामुळे बाधित झालेली शिक्षणव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. २३ नोव्हेंबर महिन्यापासून इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंतचे वर्ग सुरू झाल्यानंतर आता शासनाने ५ वी ते ८ वीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याच्या मार्गदर्शक सूचना स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी महानगरपालिका हद्दीव्यतिरिक्त सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमांच्या ५ वी ते ८ वीपर्यंतचे वर्ग असलेल्या शाळा अटी व शर्तींनुसार सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
शाळा सुरू करण्यापूर्वी ५ वी ते ८ वीपर्यंतच्या वर्गांना शिकविणाऱ्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ‘आरटीपीसीआर’ कोरोना तपासणी करून घेणे अनिवार्य आहे. काही कारणांमुळे ‘आरटीपीसीआर’ तपासणी होऊ शकली नाही, अथवा या तपासणीचा अहवाल अप्राप्त असल्यास, अशा शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्यास प्रतिबंध करावा, असेही शिक्षणाधिकारी डॉ. चव्हाण यांनी शाळाप्रमुखांना कळविले आहे. याशिवाय ग्रामपंचायतस्तरावरून शाळा निर्जंतुकीकरण करावे, शाळांना ऑक्सिमीटर, थर्मलगन उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
चौकट...
मनपाचाही दोन दिवसांत आदेश
शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांनी सांगितले की, सध्या जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याबाबत आदेश काढले आहेत. मनपा आयुक्त तथा प्रशासकांसोबत आपले बोलणे झाले असून, तेदेखील मनपा हद्दीतील पाचवी ते आठवीपर्यंत वर्ग असलेल्या शाळा सुरू करण्याबाबत दोन दिवसांत आदेश निर्गमित करणार आहेत.