औरंगाबाद - मराठा क्रांती मोर्चाकडून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. गोदावरी नदीत काकासाहेब शिंदे या तरुणाने उडी घेऊन आपला जीव दिला. त्यानंतर, राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला असून अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज पुणे-औरंगाबाद महामार्गावर कुठल्याही बसेस सुरु न ठेवण्याचा निर्णय एसटी आगाराकडून घेण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात बससेवा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे.
मराठा आंदोलक काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूनंतर मराठवाड्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. प्रामुख्याने मराठवाड्यात आज कडेकोट बंद पाळण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील आठही प्रमुख जिल्ह्यात बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय एसटी महामंडळाकडून घेण्यात आला आहे. तसेच औरंबागाबादमधील शाळा आणि महाविद्यालयेही बंद राहणार आहेत. मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, काकासाहेब शिंदे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असून त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मराठा आंदोलक त्यांच्या मूळगावी मोठ्या संख्येने हजर राहणार असल्याचे समजते. याप्रकरणी गंगापूरचे तहसीलदार चंद्रकांत शेळके आणि पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.