नांदेड : जिल्ह्यातील २ हजार १९३ जिल्हा परिषदेच्या शाळा मोबाईल डिजीटल झाल्या असून गुरूवारी जि़ प़ अध्यक्षा मंगला गुंडले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी १०० टक्के जि़ प़ शाळा डिजिटल झाल्याची उद्घोषणा केली़ यावेळी जि़ प़ चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, महिला बालकल्याण सभापती वंदना लहानकर, आनंदराव गुंडले, संजय लहानकर, जि़ प़ सदस्य रोहीदास जाधव, शिक्षणाधिकारी शिवाजी खुड्डे, सहायक कार्यक्रम अधिकारी विलास ढवळे यांची उपस्थिती होती़ प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमातंर्गत ज्ञानरचनावादी व डिजिटल शाळा करण्यावर भर देण्यात येत आहे़ राज्याचे शिक्षण आयुक्त डॉ़ पुरूषोत्तम भापकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी काळे यांच्याशी सर्व शाळा मोबाईल डिजिटल करण्याबाबत चर्चा केली होती़ त्यानुसार २७ मार्च रोजी जि़ प़ च्या यशवंतराव चव्हाण सभागृहात केंद्रस्तरावरील साधनव्यक्तींचे प्रशिक्षण व २९ मार्च रोजी सर्व केंद्रावर याबाबत प्रशिक्षण देण्यात आले़ ३१ मार्चपर्यंत जिल्हा परिषदेच्या २ हजार १९३ शाळा मोबाईल डिजिटल करण्यासाठी शिक्षण विभागाने शाळास्तरापर्यंत मोहिम राबविली़ त्यातून शाळा मोबाईल डिजिटल झाल्याची माहिती शिक्षणाधिकारी खुडे यांनी दिली़ जिल्ह्यात शैक्षणिक वातावरण तयार होत असून शिक्षक आपणहून पुढाकार घेत असल्याचे चित्र आहे़ डॉ़ बाबासाहेब आंबेडकर गुणवत्ता विकास अभियान सुरू होवून १ वर्ष पूर्ण होत आहे़ शाळांमध्ये झपाट्याने बदल होत आहे़ येत्या ५ व ६ एप्रिल रोजी प्रगत शिक्षणिक महाराष्ट्र कार्यकमातंर्गत दुसरी चाचणी घेण्यात आहे़ यासंदर्भात शिक्षण सभापती बेळगे यांनी डिजिटल शाळा मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी उपयोगी ठरतील़ (प्रतिनिधी)
जि़ प़ शाळा झाल्या मोबाईल डिजिटल
By admin | Published: April 01, 2016 12:55 AM