पैठण : तब्बल आठ महिन्यांच्या प्रदिर्घ कालावधी नंतर सोमवारी कोरोनाच्या सावटाखाली पैठण तालुक्यातील शाळेची घंटा वाजली. शाळेत ईयत्ता नववी ते बारावीचे वर्ग भरविण्यात आले. परंतु, पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्या बाबत पालकांची उदासीनता दिसून आली. सोमवारी तालुक्यातील ८७ शाळेत केवळ दोन टक्के विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावल्याचे गटशिक्षणाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.
नववी ते बारावी ईयत्ता असलेल्या पैठण तालुक्यात ८७ शाळा असून यासाठी ६४७ शिक्षक व २५७ शिक्षकेतर कर्मचारी आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरआठ महिन्यानंतर शाळा सुरू होणार असल्याने पैठण तालुक्यातील ८५९ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोवीड चाचणी करण्यात आली असून यात फक्त एक शिक्षक पॉझिटिव्ह आढळून आला आहे. उर्वरित ४५ शिक्षक व कर्मचाऱ्यांचे अहवाल मंगळवारी येतील असे गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील सतिश आखेगावकर यांनी सांगितले.
शाळेचे वर्ग सुरू होण्यापूर्वी शाळा निर्जंतुकिकरण करण्यात आले असून कोवीड अनुषंगाने ईतर सुरक्षेची साधने शाळेत ठेवण्यात आली आहेत. मार्च महिण्यात दहावीचा भुगोल विषयाचा पेपर बाकी असताना परिक्षा रद्द करून शाळेला कुलूप ठोकण्यात आले होते. शैक्षणिक वर्ष सुरू होताच शाळा बंद ठेवून ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले होते. दरम्यान, ऑनलाइन शिक्षणात ईंटरनेटची बाधा व मोबाईल उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले. आजपासून शाळा सुरू झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. परंतु, कोवीडची दुसरी लाट येणार असल्याच्या चर्चेने पालकांची धाकधूक वाढीस लागली आहे. अशा परिस्थितीत मुलांना शाळेत पाठवायचे का या बाबत पालक संभ्रमात पडले आहे.
विद्यार्थ्यांची उपस्थिती अत्यंत कमी...पैठण शहरातील आर्य चाणक्य शाळेत आज पहिल्या दिवशी ईयत्ता १० वी चे केवळ १२ विद्यार्थी आले होते. शाळेत एक दिवस ९ वी व दुसऱ्या दिवशी १० असे वर्ग घेण्यात येणार आहे. सुरक्षे बाबत काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत असून ज्या शिक्षकांंचे कोवीड अहवाल आला नाही अशा शिक्षकांना आज बोलवण्यात आले नाही असे शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती जोशी यांनी सांगितले. हळूहळू विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढेल अशी अपेक्षा जोशी यांनी व्यक्त केली.
जि प शाळेत १५ मुली.....पैठण येथील जि प मुलींच्या प्रशालेत ३०० पैकी आज केवळ १५ मुली उपस्थित होत्या असे मुख्याध्यापक जगन्नाथ विघ्ने, गणपत मिटकर यांनी सांगितले.