औरंगाबाद : बिबी का मकबऱ्यातील प्रवेशद्वारावरच्या चित्रांचे वैज्ञानिक संवर्धनाचे काम भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या पश्चिम विभागीय विज्ञान शाखेने हाती घेतले आहे. त्यामुळे मकबऱ्यातील कबरीजवळच्या मार्बलच्या जाळ्या, काळवंडलेल्या घुमटाला झळाळी मिळणार असून, पुढील २ ते ३ महिन्यांत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
‘मकबरा काळवंडला, प्लास्टरच्या खपल्या’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने मकबऱ्याच्या दुरावस्था ३१ ऑगस्टला समोर आणली होती. त्यावर इतिहासप्रेमींसह तज्ज्ञांनी पुरातत्व विभागाने संवर्धन हाती घेण्याची मागणी केली होती. ‘दख्खनचा ताज’ म्हणून जगविख्यात आणि पर्यटकांचे आकर्षण केंद्र असलेल्या बिबी का मकबऱ्याचे संवर्धन शुक्रवारपासून भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या विज्ञान शाखेच्या पश्चिम विभागाने हाती घेतले आहे. प्रवेशद्वारावरील मुघलकालीन चित्रांचे रंग उडाले आहे. काही चित्र नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. काळवंडलेल्या भागावर रसायनांच्या मदतीने साफसाफाई करून त्यांचे संवर्धन, तर अनेक गमावलेल्या चित्रांचे पुनरूज्जीवन पुरातत्व विभागांचे कलाकार करतील. असे पुरातत्व विभागाकडून सांगण्यात आले.
---
लाल किल्ल्याच्या यशस्वितेनंतर मकबऱ्यात संवर्धन
दिल्लीच्या लाल किल्ल्यात अशाच प्रकारची मुगलकालीन चित्रांच्या वैज्ञानिक संवर्धनाचे काम झाले. त्याच्या यशस्वितेनंतर मकबऱ्याच्या प्रवेशद्वार, कबरीजवळील चित्रांचे संवर्धन केल्या जात आहे. त्यासाठी लागणारे विशिष्ठ रंग राजस्थानसह विविध ठिकाणांहून आणून आधीच्या रंगांशी जुळवल्या जातात. मुघलकालीन अलंकारीक चित्रांचे संवर्धन खूप आव्हानात्मक काम असून विज्ञान विभागाचे टीम वर्कमधून हे काम होईल, असा विश्वास कलाकार सुधीर वाघ यांनी व्यक्त केला.
--
मकबर्याच्या घुमटाच्या मार्बलचे ट्रिटमेंट केले जाणार आहे. आतमधील मुख्य कबर आहे. तेथील मार्बलच्या जाळ्या तांबड्या, काळसर झाल्या असून मार्बलवर प्रक्रीयेचे एक तंत्र आहे. त्यानुसार सफाईसाठी आवश्यक ट्रिटमेंटच्या कामाची पुर्वतयारी सध्या सुरु आहे. त्यांच्यावर रासायनिक प्रक्रीया केल्या जाणार आहे. तसेच प्रवेशद्वारावरच्या चित्रांचे वैद्यानिक संवर्धन केल्या जाईल. पुढील दोन ते तीन महिने हे काम चालेल.
-श्रीकांत मिश्रा, उपाधीक्षक, विज्ञान शाखा पश्चिम क्षेत्र, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण