उमरगा : जि. प. गटाच्या ९ व पं. स. गणाच्या १८ जागांसाठी दाखल झालेल्या २३९ नामनिर्देशनपत्रांची छाननी गुरूवारी निवडणूक निर्णय अधिकारी निलेश श्रींगी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी गटाच्या ५, तर गणांचे ७ अर्ज अवैध ठरले. अर्ज बाद झालेल्यांमध्ये प्रामुख्याने उमरगा बाजार समितीचे सभापती तथा काँग्रेसचे बलसूरमधील अधिकृत उमेदवार देविदास दादाराव भोसले, अपक्ष गौतम सूर्यवंशी, रिपाइंचे हरिश डावरे, भारिपचे गांधीजी गायकवाड, काँग्रेसच्या जयमाला बिराजदार आदींचा समावेश आहे. गणांमधून बलसूरमधील भारिपच्या उषा गायकवाड, माडजमधील अपक्ष विभूते विलास, तलमोड गटातील भाजपच्या छायाबाई गोखले, कदेरमधील शिवसेनेच्या गोकर्णा बनसोडे, कवठा येथील काँग्रेसचे बालक मदने, कवठामधील शकुंतला वाघमोडे, कवठामधील अपक्ष चंद्रकांत स्वामी असे एकूण ७ अर्ज अवैध ठरविण्यात आले. छाननीवेळी कोणत्याही पक्षाने अथवा उमेदवाराने एकमेकांच्या अर्जावर हरकती घेतल्या नाहीत. बहुतेक जणांचे अर्ज हे पक्षाने इतरांना अधिकृत उमेदवारी दिल्याने बाद ठरल्याचे दिसून आले. दरम्यान, देविदास भोसले यांचे कवठा गटात गाव असताना त्यांनी बलसूरमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, यासाठी बलसूर गटातीलच व्यक्तीला सूचक घेण्याऐवजी त्यांनी कवठा गटातील मतदाराला सूचक केल्याने त्यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला.
उमरग्यात २३९ अर्जांची छाननी
By admin | Published: February 03, 2017 12:44 AM