औरंगाबाद : गरोदर महिलांची तपासणी देशभरात मोफत केली जाते. औरंगाबादेत महापालिकेच्या रुग्णालयांसह आरोग्य केंद्रात विविध तपासण्यांचे शुल्क आकारण्यात येते. हा गंभीर प्रकार त्वरित बंद करावा. गरोदर महिलांच्या विविध तपासण्या शासनाने नेमलेल्या महालॅबमार्फत करण्याचे आदेश मनपाचे नवनियुक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी पारस मंडलेचा यांनी दिले.
गरोदर महिलांची आरोग्य तपासणी, विविध वैद्यकीय तपासण्या मोफत करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. मात्र, महापालिकेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या काही रुग्णालयांमध्ये, आरोग्य केंद्रात रितसर पावती देऊन महिलांकडून फी वसूल करण्यात येते. वास्तविक पाहता गरोदर महिलांच्या तपासण्या शासनाने नेमलेल्या महालॅबमार्फत मोफत करायला हव्यात. २०१४ पासून महापालिका एका नियमाचा आधार देत गरोदर महिलांकडून फी वसुली करीत आहे. हा सर्व प्रकार नवनियुक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी पारस मंडलेचा यांच्या मंगळवारी निदर्शनास आला. त्यांनी त्वरित महालॅबच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना बोलावून तोंडी समज दिली. यापुढे गरोदर महिलांच्या शंभर टक्के तपासण्या महालॅबनेच केल्या पाहिजेत असे निर्देश दिले. महापालिकेच्या काही आरोग्य केंद्रात सलाईन लावण्यासाठी स्टँड नाही. भिंतीच्या खिळ्याला सलाईनची बाटली लटकवण्यात येते. रुग्ण तपासणीसाठी कर्टन स्टॅन्ड नाही. एका आरोग्य केंद्रात रुग्ण तपासणीला बेड नाही. मनपाच्या भांडार विभागात २०० बेड पडून आहेत. कर्टन स्टँड कुजून जात आहेत. शेकडो पडदे पडलेले आहेत. हे सर्व साहित्य आरोग्य केंद्रांना का देण्यात आले नाही, याची विचारणाही त्यांनी संबंधितांना केली. आरोग्य केंद्र, रुग्णालयांची सेवा सक्षम करून जास्तीत जास्त नागरिकांना सेवा देण्याचे आवाहन त्यांनी सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना केले. पावसाळ्यात साथरोग उद्भवल्यास उपाययोजनांचे निर्देशही दिले. झोन १ ते ९ पर्यंत रॅपिड रिस्पॉन्स टीम स्थापन करण्यात आली.