छत्रपती संभाजीनगर : महापालिका मुख्यालयातील रेकॉर्ड रूममध्ये फायलींचे गठ्ठे ठेवण्यासाठी जागाच शिल्लक नव्हती. मागील ५० ते ७० वर्षे जुने रेकॉर्ड या ठिकाणी होते. त्यातील बहुतांश रेकॉर्ड तर काहीच कामाचे नव्हते. मागील एक महिन्यांपासून सर्व रेकॉर्डची तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत ७३ हजार फायलींची चाळणी करण्यात आली. आणखी एक ते दीड लाख फाईलींची तपासणी करणे बाकी आहे.
महापालिका मुख्यालयातील रेकॉर्ड रूमची प्रशासक जी. श्रीकांत यांनी मागील महिन्यात पाहणी केली होती. याठिकाणी पडून असलेल्या फायली बिनकामाच्या असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तत्कालीन मुख्यमंत्री, मंत्र्यांचे दौरे, वर्तमानपत्रात महापालिकेच्या संदर्भात छापून आलेल्या बातम्यांची कात्रणे, १०-२० रुपयांची बिले, सामाजिक सभागृह कोणाला भाड्याने दिली ते रजिस्टर अशा अनेक फायलींची संख्या लाखोंच्या घरात होती. एका गठ्ठ्यात किमान २५ ते ५० फायली बांधून ठेवण्यात आल्या होत्या. प्रत्येक गठ्ठ्यावर संबंधित विभागाचे नाव लिहिले होते. बिनकामाच्या फायली निकाली काढून रेकॉर्ड रूम लातूरच्या धर्तीवर अद्यायवत करण्याचा निर्णय प्रशासकांनी घेतला. त्यानुसार कामाला सुरूवात केली.
४ हजार ३४४ गठ्ठे काढलेप्रत्येक विभागाच्या फायली वेगवेगळ्या केल्या जात असून, अधिकारी-कर्मचारी यातील कोणत्या फायली जपून ठेवायच्या, कोणत्या निकाली काढायच्या याचा निर्णय घेत आहेत. आयुक्तांचे स्वीय्य सहायक दीपक जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली फायलींच्या वर्गीकरणाचे काम सुरू आहे. आतापर्यंत ४ हजार ३४४ गठ्ठे काढण्यात आले असून, त्यातील १७८० गठ्ठ्यामधील ७३ हजार ६१० फायलींचे वर्गीकरण करण्यात आले आहे.