लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : गतवर्षीच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या ४० टक्के गणेशमूर्ती विक्रीविना शिल्लक आहेत. राज्य सरकारने पीओपीच्या मूर्तीवर बंधने आणली तर फजिती होऊ नये म्हणून शहरातील मूर्तिकारांनी शाडू मातीच्या मूर्ती तयार करण्यास सुरुवात केली आहे.
यंदा गणेशोत्सवाला १० सप्टेंबरपासून सुरुवात होईल. यंदाही कोरोना काळातच गणेशोत्सव येण्याची परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. मूर्ती असो की, गणेशोत्सवाची नवी नियमावली राज्य सरकार १५ ते २० दिवस अगोदर जाहीर करत असते. गतवर्षी कोरोनामुळे पीओपीच्या मूर्ती विक्रीला राज्य सरकारने मुदतवाढ दिली होती. मात्र, कोरोनाचा मोठा फटका मूर्तिकारांना बसला होता. लहान, मध्यम आकाराच्या ४० टक्के मूर्ती विक्रीविना शिल्लक राहिल्या आहेत. जर सरकारने पीओपीच्या मूर्ती विक्रीला बंदी आणली तर ऐनवेळी फजिती नको म्हणून शहरातील मूर्तिकारांनी शाडू मातीच्या मूर्ती बनविण्यास सुरुवात केली आहे. ज्यांचे एकत्र परिवार आहेत, तिथे मूर्तीकामाला वेग आला आहे. मूर्ती तयार करणारे घरचेच सदस्य आहेत. ऑगस्ट महिन्यात मूर्तीच्या रंगरंगोटीला सुरुवात होईल. यंदाही घरगुती मूर्ती २ फुटापेक्षा उंच नसावी व मंडळाची सार्वजनिक मूर्ती ४ फुटापेक्षा उंच नसावी, हा नियम कायम राहील, हे लक्षात घेऊनच शहरातील ५०पेक्षा अधिक परिवार गणेशमूर्ती बनवत आहेत.
चौकट
शाडूच्या मूर्तीला लागतो वेळ
पीओपीच्या मूर्ती साच्यातून काढल्या की, त्यांचे फिनिशिंग केले जाते. शाडू मातीच्या मूर्ती साच्यातून काढल्यानंतर सोंड, हात बसवावे लागतात व नंतर फिनिशिंग केले जाते. दिवसभरात पीओपीच्या ४० ते ५० मूर्ती तयार होतात तिथे शाडू मातीच्या ४ ते ५ मूर्ती तयार होतात. एवढा वेळ लागतो.
- दिनेश बगले
मूर्तिकार