वाळूज महानगर : सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे तब्बल दोन कोटींचे कर्ज थकवल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने महसूल विभागाने गुरुवारी वाळूज एमआयडीसीतील सार इंडस्ट्रिज कंपनीला सील लावले.
वाळूज एमआयडीसीतील सार इंडस्ट्रिजचे बिपीन अशोकराव सोनवणे व कविता बिपीन सोनवणे (रा. विसावा, नागेश्वरवाडी) यांनी सेंट्रल बँकेच्या क्रांती चौक शाखेतून २ कोटी ७ लाख २ हजार ७४३ रुपये कर्ज घेतले होते. मात्र, कर्जाची परतफेड केली जात नसल्याने बँकेच्या अधिकाºयांनी जिल्हाधिकाºयांकडे दाद मागितली.
यानंतर जिल्हाधिकाºयांनी बिपीन सोनवणे व कविता सोनवणे यांना नोटीस बजावली. मात्र, सोनवणे यांनी कुठलाही प्रतिसाद न दिल्याने सार इंडस्ट्रिज जप्त करुन याचा ताबा बँकेच्या अधिकाºयांना देण्याचे आदेश तहसीलदारांना दिले. यानंतर मंडळ अधिकारी सतीश भदाणे, रांजणगाव सज्जाचे तलाठी राहुल वंजारी आदींनी बँकेच्या अधिकाºयांना सोबत घेऊन पोलीस बंदोबस्तात गुरुवारी सार इंडिस्ट्रजला भेट दिली.
यावेळी महसूलच्या पथकाला कंपनीत मशिनरी दिसून आली नाही. त्यामुळे कंपनी इमारतीचे सर्व प्रवेशद्वार सील करण्यात आले. यानंतर सेंट्रल बँकेचे प्राधिकृत अधिकारी महेशकुमार मित्तल यांच्याकडे कंपनीचा ताबा दिल्याचे मंडळ अधिकारी भदाणे यांनी सांगितले.