बाबासाहेब धुमाळ
वैजापूर : केंद्र शासनाने एक लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांचे रेशनकार्ड रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अपात्र शिधापत्रिकांची शोध मोहिम १ फेब्रुवारी ते ३० एप्रिल या कालावधीत राबविण्यात येणार आहे. बीपीएल, अंत्योदय, अन्नपूर्णा, केशरी, शुभ्र अशा कार्डधारकांचा शोध घेऊन त्यांचे उत्पन्न एक लाखाच्या वर आहे का? याची पडताळणी केली जाणार आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाखांपेक्षा जास्त असेल त्यांचे रेशन कार्ड रद्द करण्यात येणार असून त्यांना मागणीनुसार पांढरे रेशनकॉर्ड देण्यात येणार आहे.
या मोहिमेसाठी तहसिलदारांच्या नियंत्रणाखाली पुरवठा अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी व अन्य शासकीय अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. विदेशी नागरिकत्व असलेल्या व्यक्तींची शिधापत्रिका, याशिवाय धान्याची उचल न झालेल्या शिधापत्रिका, एक लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या शिधापत्रिका शोधण्यात येणार असून अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती, स्थलांतरित व्यक्ती, मयत व्यक्ती या लाभार्थ्यांची नावे वगळण्यात येणार असल्याचे अध्यादेशात म्हटले आहे. शिधापत्रिकाधारकांनी फॉर्म भरुन देताना रहिवासी पुरावा, भाडेपावती, गॅस जोडणी क्रमांक, बँक पासबुक, विजबील, ड्रायव्हिंग लायसन्स, ओळखपत्र, आधारकार्ड यापैकी एक पुरावा फॉर्म सोबत जोडणे आवश्यक आहे. यापूर्वीही अनेक गरजूंना शिधात्रिका नसल्याने त्यांना धान्यापासून वंचित राहावे लागले आहे. यामुळे या मोहिमेत या गरजूंना शिधापत्रिका मिळेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
चौकट
वैजापूर तालुक्यातील स्थिती
एकूण रेशनकार्ड धारक : ६३८२८
शुभ्र रेशनकार्ड : २५००
केसरी (एपीएल) : ५८१५
प्राधान्यक्रम व बीपीएल : ४१८१५
अंत्योदय : ४६९८
एनपीएच : ९०००
कोट येणार