छत्रपती संभाजीनगर : करचुकवेगिरी करणे किती महाग पडते, याचे उदाहरण मागील आर्थिक वर्षात बघण्यास मिळाले. राज्य जीएसटी विभागाने एप्रिल २०२२ ते जानेवारी २०२३ या काळात ४६ ठिकाणी सर्च ऑपरेशन करीत दंडासह एकूण १५ कोटी रुपयांची रक्कम वसूल केली. एवढेच नव्हे, तर ४ जणांवर कारवाई करीत त्यांना बेड्या ठोकल्या. या करचुकवेगिरी करणाऱ्यांचे धंदे ‘चौपट’ झालेच; शिवाय समाजात बदनामी झाली, जी कधी भरून न निघणारी होती.
छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत मिळून २७ हजार जीएसटी नोंदणीधारक आहेत. यातील बहुतांश व्यापारी, उद्योजक प्रामाणिकपणे जीएसटी भरतात. मात्र, काही असे आहेत, की ते पैशांच्या मोहापायी करचुकवेगिरीचा प्रयत्न करतात. पण, आता अद्ययावत ऑनलाइन तंत्रज्ञानामुळे करचुकवेगिरी करणाऱ्याला जीएसटीची प्रणाली शोधून काढतेच. ‘ई वे बिल’ न भरता मालाची वाहतूक करणारेही आता सिस्टमच्या तावडीतून सुटू शकत नाहीत. कारण टोलनाक्यावर बसविलेले कॅमेरे व ‘फास्ट ट्रॅक’ यातून ई वे बिल न भरणारे बरोबर अडकले जातात. याशिवाय राज्य जीएसटी विभागाचे अधिकारी विविध ठिकाणी थांबून प्रत्येक माल वाहतूक करणाऱ्या ट्रक, टेम्पोची तपासणी करीत आहेत व त्यात ई वे बिल न भरणारे, कर चोरी करणारे सापडत आहेत. यामुळे करचोरी कराल तर पकडले जालच, ही आता काळ्या दगडावरची रेघ आहे.
शासनाची फसवणूक करणाऱ्यांचा पर्दाफाशबनावट कंपन्या, आस्थापनांच्या नावाने शेकडो बनावट देयके दाखविण्यात आली. त्याद्वारे कोट्यवधी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) मिळविण्यात आले. याद्वारे शासनाची फसवणूक करणाऱ्यांचा पर्दाफाश करण्यात राज्य जीएसटी विभागाला यश आले. ही कारवाई तीन महिन्यांपूर्वीच झाली. यात चार जणांना अटक करण्यात आली आहे.
करचुकवेगिरी कराल, तर कारवाई होणारचकरचुकवेगिरी करणाऱ्यावर राज्य जीएसटी विभागाची करडी नजर आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या साह्याने कर बुडविणारा पकडला जातोच. यामुळे आता करचुकवेगिरीचा कोणी प्रयत्न करू नये, प्रामाणिकपणे जीएसटी भरावा व कारवाई टाळावी. तसेच कर भरून देशाच्या विकासात हातभार लावावा.- जी. श्रीकांत, सहआयुक्त, जीएसटी विभाग