औरंगाबाद : रमजान ईदच्या निमित्ताने विविध प्रकारच्या अत्तरांची खरेदी आवर्जून केली जाते. मेंदी, अत्तर आणि सुरमा यांचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी रमजान ईदचा काळ हा एक मुख्य हंगाम असतो; पण यंदा मात्र ऐन हंगामात विक्री होत नसल्याचे मेंदी आणि अत्तर व्यावसायिक चिंताग्रस्त झाले आहेत.
याविषयी सांगताना अत्तर व्यावसायिक म्हणाले की, दरवर्षी रमजान ईदनिमित्त खास राजस्थान येथून मेंदी मागविली जाते. एक क्विंटल सुकी मेंदी मागविली तरी ती बऱ्याचदा पुरायची नाही. यातून एका व्यापाऱ्याची उलाढाल जवळपास ७० ते ८० हजार रुपये एवढी व्हायची; पण यावर्षी मात्र सगळे काही जवळपास शून्यावरच आले आहे. राजस्थानहून मेंदी मागविलेलीच नाही. मुंबई येथील व्यापाऱ्यांकडून काही दिवसांपूर्वी जे मेंदी कोन मागविण्यात आलेले होते, तेच अजूनही विक्रीविना पडून असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. मेंदी व्यावसायिकांसाठी रमजान ईद, दिवाळी आणि लग्नसराई असे काही मोजके हंगाम आहेत. यापैकी ईद आणि लग्नसराई हे दोन मुख्य हंगाम हातातून गेले. आता दिवाळीनंतर पुढची लग्नसराई येईपर्यंत वाट बघण्याशिवाय हातात काहीही नाही, याची खंत व्यावसायिकांनी व्यक्त केली.
अत्तर विक्री शून्यावरवर्षभराचा आढावा घेतला, तर अत्तर व्यावसायिकांसाठीही व्यवसायाच्या दृष्टीने रमजान ईदचा काळ हा अतिशय महत्त्वाचा असतो. गरीब-श्रीमंत प्रत्येक जण यादरम्यान आपापल्या ऐपतीप्रमाणे अत्तर खरेदी करतो. उंची अत्तराच्या एका कुपीची किंमतही हजाराच्या घरात असते. मात्र, अत्तरप्रेमी या काळात पैशाचा फार विचार न करता हात मोकळा सोडून पैसा खर्च करतात; पण यावर्षी मात्र व्यवसाय पूर्णपणे बंद असल्याने अत्तर व्यापाऱ्यांची ईदही सुनीसुनीच असणार आहे.
व्यवसाय ठप्पहात, नखे आणि केस रंगविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची मेंदी रमजान ईदच्या काळात मोठ्या प्रमाणात विक्री होत असते; पण यावर्षी सगळेच व्यवसाय ठप्प झाल्याने लोकांकडे मेंदी, अत्तर घेण्यासाठी पैसेच नाहीत. ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांची इच्छा होत नाही, त्यामुळे मेंदी कोनाची विक्री ५ हजार रुपयांपर्यंतही गेलेली नाही. अत्तरची विक्री तर पूर्णपणे शून्यावर आली आहे. - मोहसीन, अत्तर आणि मेंदी विक्रेते