आष्टी : निवडणुकीचे फड संपताच आता ऊसतोडीचे फड आखण्यात आले आहेत. यंदा पावसाच्या अनिश्चित व अनियमितेमुळे ऊस तोडणीला उशीर झाला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावरच ऊसतोड मजूर आपल बिऱ्हाड घेऊन जाताना दिसत आहे. जिल्ह्यात आष्टी तालुक्यातून सर्वाधिक ऊस तोड कामगाराची संख्या सर्वाधिक आहे. दरवर्षी दिवाळीच्या तोंडावर आपल बिऱ्हाड घेऊन जाणाऱ्या कामगारांची दिवाळी त्यांच्या घरीच होईल अशी अपेक्षा होती. मात्र दिवाळी सणातच ऊसतोडीला वेग आला असल्याने तालुक्यातील गावगावचे ऊसतोडणी कामगार संग घेऊन लाडीला..निघालो ऊसाच्या तोडीला असं म्हणत कारखान्यांकडे मार्गस्थ होताना दिसत आहे.आष्टी, पाटोदा, शिरुर तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात ऊसतोड कामगारांची संख्या अधिक आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळेच पिकांचे नेट उत्पन्न पदरात पडत नसल्यानेच या भागातील नागरिक ऊसतोडणीसाठी जात असतात. ऊस तोडीची अनामत रक्कम घेऊन ६ महिन्याच्या करारानुसार या भागातील उसतोडणी मजूर पाटस, चंद्रभागा, अकलूज, निराभिमा, सोमेश्वर, बारामती यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक कारखान्यावर जातात. मात्र गाव सोडून कोसो मैल दूर जाणाऱ्या ऊसतोड कामगारांना कवडीमोल मूरीवर राबवावे लागत असते. ऊसतोड कामगारांना योग्य मजुरी देऊन सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी कामगार नवनाथ कांबळे, विठ्ठल शेरकर, संतोष साळवे आदींनी केली आहे. (वार्ताहर)
ऊसतोड मजुरांची दिवाळी फडातच !
By admin | Published: October 21, 2014 12:18 AM