औरंगाबाद : वर्षभरात समाजकल्याण विभागाच्या योजनांचे नियोजन झाले नाही. प्रशासनाने तयारी दर्शविली, तर सभापती मंजूर केलेल्या याद्यांना खोडा घालत होते. सभापती कमकुवत निघाले. महिला व बालकल्याण विभागाने लाभार्थ्यांच्या खात्यावर अजूनही अनुदानाची रक्कम जमा केलेली नाही, असा आरोप रमेश गायकवाड यांनी करताच व्यासपीठावरील महिला व बालकल्याण सभापती कुसुम लोहकरे यांचा पारा चढला. सभापती कमकुवत आहेत, तर तुम्ही कोणते दिवे लावले, या शब्दांत त्यांनी गायकवाड यांच्यावर तोफ डागली.
स्थायी समितीच्या बैठकीत सदस्य रमेश गायकवाड यांनी समाजकल्याण विभागाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, समाजक ल्याण अधिकारी मीना अंबादेकर यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामुळे समाजकल्याण अधिकाऱ्यांचा अतिरिक्त पदभार आता खुलताबाद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ज्ञानोबा मोकाटे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे; परंतु हा पदभार सांभाळण्यासाठी ते इच्छुक नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अन्य सक्षम अधिकाऱ्यांकडे हा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला पाहिजे. मागील वर्षात समाजकल्याण विभागाच्या योजना मार्गी लागल्या नाहीत. अधिकारी लाभार्थ्यांच्या याद्या विषय समितीच्या बैठकीत सादर करायचे, तेव्हा समाजकल्याण सभापती याद्यांमध्ये बदल करण्यासाठी ती प्रक्रिया थांबवायचे. सभापतींमुळेच समाजकल्याण विभागाच्या कोणत्याही योजनांचा निधी खर्च होऊ शकला नाही. ते कमकुवत निघाले. त्यानंतर महिला व बालकल्याण विभागाच्या योजनांच्या वस्तू खरेदी केल्यानंतर लाभार्थ्यांनी विभागाकडे पावत्या सादर केल्या; परंतु अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा केलेली नाही.
हे ऐकल्यानंतर व्यासपीठावर बसलेल्या महिला व बालकल्याण विभागाच्या सभापतींचा पारा चढला. त्यांनी थेट रमेश गायकवाड यांच्यासह सभागृहातील अन्य सदस्य, सभापतींविरुद्ध आरोप केला. त्या म्हणाल्या की, मी कमकुवत आहे, तर तुम्ही कोणते दिवे लावले. तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम यांच्यासंबंधी चौकशी समिती नेमली होती. ती चौकशी करण्याऐवजी तुम्ही समितीतील सारेच ‘मॅनेज’ झाले. तुम्ही ती चौकशीच दडपून टाकली आणि आम्ही कमकुवत आहोत, असे म्हणता. तेव्हा त्यांच्या स्वीय सहायकाने ‘ते तुम्हाला कमकुवत सभापती म्हणाले नाहीत, ते समाजकल्याण सभापतींना म्हणाले, असे कानात जाऊन सांगितल्यावर त्यांना चूक लक्षात आली. दरम्यान, या घटनेमुळे सभागृहात उपस्थित सदस्य, पदाधिकारी, अधिकाऱ्यांची चांगलीच करमणूक झाली.
स्थायी समितीच्या बैठकीवर मोर्चातालुक्यातील अंजनडोह येथील ग्रामस्थांनी मंगळवारी जिल्हा परिषदेत स्थायी समितीची बैठक सुरू असताना मोर्चा नेला. तेथील राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. ७० टक्के काम पूर्ण झालेले असताना माजी सरपंच आणि विद्यमान सरपंच हे या योजनेत जाणीवपूर्वक राजकारण करून खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहे. ही योजना पूर्ण झाली, तर अंजनडोह गावाचा पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटणार आहे. त्यामुळे हे काम कोणत्याही परिस्थितीत बंद पडणार नाही, याची प्रशासनाने दखल घ्यावी, असे ग्रामस्थांचे म्हणणे होते. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर, उपाध्यक्ष केशव तायडे, बांधकाम सभापती विलास भुमरे यांनी योजनेचे काम बंद पडणार नाही, यासाठी प्रशासनाला सूचना केल्या जातील, असे आश्वासन दिल्यानंतर मोर्चेकरी निघून गेले.
धोकादायक शाळा इमारतींची तपासणी कराजिल्ह्यात इंग्रजी शाळांचे पेव फुटले आहे. मिळेल तेवढ्या जागांवर इमारती बांधून या शाळा पालकांना आकर्षित करीत असल्या, तरी दुर्दैवाने एखादी दुर्घटना घडल्यास यापैकी अनेक शाळांमध्ये संकटकाळी सहज बाहेर पडण्याचा मार्ग नाही, अशा धोकादायक शाळा इमारतींची तपासणी करून गटशिक्षण अधिकाऱ्यांनी आठ दिवसांत शिक्षणाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करावा. त्या शाळांवर शिक्षणाधिकारी कारवाई करतील, असा ठराव स्थायी समिती सदस्य तथा शिवसेनेचे गटनेते अविनाश गलांडे यांनी मांडला.