औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेऊनही कोरोनाबाधित झालेले रुग्ण, तसेच दुसऱ्यांदा कोरोनाबाधित झालेल्या रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पुणे येथील ‘एनआयव्ही’ला पाठविण्यात येत आहे. त्यातून कोरोना विषाणूत काही बदल झाला आहे का, स्ट्रेन बदलला आहे का, हे स्पष्ट होणार आहे.
जिल्ह्यात काेरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेऊनही काही आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. दुसरा डोस घेतल्यानंतर साधारण १४ ते १५ दिवसांनी अँटिबाॅडीज तयार होतात. परंतु त्यापूर्वीच बहुतांश जणांना कोरोनाची लागण झाली. सुदैवाने लसीकरणामुळे अशांमध्ये कोणतीही गंभीर लक्षणे आढळून आली नाहीत. त्यामुळे लसीकरणाचा निश्चितच फायदा होत असल्याचे स्पष्ट आहे. याबरोबरच अनेकांना दुसऱ्यांदा कोरोनाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेकडून चिंता व्यक्त होत आहे. राज्यभरात अनेक ठिकाणीही हा प्रकार आढळला आहे. यासंदर्भात ‘एनआयव्ही’ येथे अभ्यास सुरू आहे. औरंगाबादेत लसीचे दोन डोस घेऊनही कोरोनाबाधित झालेले रुग्ण आणि दुसऱ्यांदा कोरोनाबाधित झालेल्या रुग्णांचेही स्वॅब तेथे पाठविण्यात येत आहे. त्यातून विषाणूबद्दल काही नवी माहिती समोर येते का अथवा जुनाच विषाणू आहे, ही बाब समोर येणार असल्याचे घाटीतील अधिकाऱ्यांनी सांगितले.