सोयगाव : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाल्यानंतर सर्वत्र हाहाकार उडाला. गावागावात कोरोनाबाधितांचा तर उपचारादरम्यान मृत्यूचे तांडव सुरू झाले. एकीकडे अशी भीषण परिस्थिती असतानाही सोयगाव तालुक्यातील ३३ गावांनी मात्र कोरोनाला वेशीबाहेरच रोखून धरले हे विशेष. ग्रामस्थांच्या एकजुटीला प्रशासनाचा धीर मिळाल्याने संसर्गाला रोखण्यात या गावांना यश मिळाले आहे.
तालुक्यातील ८४ महसुली गावांपैकी ३३ गावांनी कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेला गावात प्रवेशच होऊ दिला नाही. या गावांतील नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या निर्बंधाचे कडक पालन केले आहे. त्याचबरोबर, तालुका आरोग्य विभागाकडून करण्यात आलेल्या सूचनांचे ग्रामपंचायत स्तरावर उपाययोजना केल्या गेल्या. तालुक्यात दुसऱ्या लाटेत तब्बल ९१६ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली. त्यापैकी जरंडी, निंबायती कोविड केंद्रातून ५२७ रुग्णांवर उपचार देण्यात आले, तर उर्वरित ४०० रुग्णांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले, तर तालुक्यातील ५१ गावे दुसऱ्या लाटेत मात्र बाधित झाली आहेत. बुधवारी ६२ सक्रिय रुग्ण जरंडी आणि निंबायतीच्या कोविड केंद्रात उपचार घेत आहे. आतापर्यंत ८८ रुग्णांना औरंगाबादला तातडीच्या उपचारासाठी हलविण्यात आले असल्याचे आरोग्य विभागाने सांगीतले.
तीन दिवसांपासून जरंडी केंद्र पूर्ण क्षमतेने भरले
सोयगाव तालुक्यात कमी झालेला संसर्ग पुन्हा डोकेवर काढीत आहे. तीन दिवसांपासून जरंडी कोविड केंद्र शंभर टक्के पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे बंद करण्यात आलेले निंबायतीचे कोविड केंद्र पुन्हा सुरू करण्याची वेळ आरोग्य प्रशासनावर आली. सध्या निंबायती केंद्रात बारा रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
तालुक्यात संचारबंदीचे पूर्णपणे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. सध्या ३३ गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. पोलीस प्रशासनाकडून जनजागृतीचे काम सुरू आहे.
- सुदाम शिरसाठ, पोलीस निरीक्षक, सोयगाव
तालुक्यातील वाढीव चाचण्या व लसीकरण सुरू आहे. सध्या तालुक्यातील ३३ गावांत कोरोनाचा शिरकाव रोखण्यात यश आले असून, ती जमेची बाजू आहे. आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणातून ९५ टक्के नागरिक मास्कचा वापर करीत आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, लक्षणे असल्यास योग्य वेळी उपचार घ्यावे, असे आवाहन राहील.
- डॉ. श्रीनिवास सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी.