औरंगाबाद : राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट तीव्र होत असून, जिल्ह्यात वाढीव रुग्ण संख्येच्या प्रमाणात सर्व यंत्रणांनी अत्यावश्यक उपचार सुविधांसह सज्ज राहून खबरदारी घेण्याचे आवाहन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी केले.
समन्वय आणि सतर्कतापूर्ण प्रतिबंधात्मक उपाययोजनांद्वारे संसर्गापासून जिल्ह्याचे संरक्षण करावे. प्रशासनाने ट्रेकिंग, टेस्टिंग तसेच ट्रिटमेंटवर भर द्यावा, असेही त्यांनी नमूद केले. जिल्ह्यातील कोरोना संसर्ग व प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या संदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पालकमंत्री देसाई यांनी शुक्रवारी सर्व यंत्रणांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. देसाई यांनी घाटीतील गंभीर रुग्णांचा मृत्युदर कमी करण्याच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेण्याचे सूचित केले. ‘नो मास्क नो लाइफ’ अशा स्थितीपर्यंत परिस्थिती आलेली आहे. त्यामुळे मास्क वापरासह कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन जनतेने केले पाहिजे. ऑक्सिजन साठा, वाढीव खाटा, औषधांची उपलब्धतेकडे लक्ष द्यावे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना जनजागृतीबाबत आवाहन करणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.
जिल्ह्यात ११ हजार ७६३ बेड्सजिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बैठकीत सांगितले, जिल्ह्यात एकूण ११५ उपचार सुविधा उपलब्ध असून, ११,७६३ आयसोलेशन बेड, २१२४ ओटु बेड, तर ५३२ आयसीयू बेड, तसेच ३०० व्हेंटिलेटर असल्याचे सांगितले. जिल्ह्यात ऑक्सिजनचा साठा उपलब्ध राहील याकडे लक्ष आहे. ३३ ठिकाणांसह मोबाइल व्हॅनद्वारे लसीकरणाची सुविधा तयार आहे.
लॉकडाऊनची कडक अंमलबजावणीपोलीस आयुक्त निखिल गुप्ता म्हणाले, शहरात १० मार्चपासून मार्शल लॉकडाऊनचा आदेश काढला आहे. आजपासून रात्री ८पासून ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. गरजू लोकांना मास्क वाटप सुरू आहे. कठोर उपाययोजना केल्यास रुग्णांची संख्या कमी होण्यास मदत होईल, असे गुप्ता म्हणाले.
दहा हजार रुग्णांवर उपचाराची सोयमहापालिका आयुक्त अस्तिक कुमार पाण्डेय यांनी चाचण्यासाठी ५४ मोबाइल पथके तयार केल्याचे सांगितले. २०पेक्षा अधिक रुग्ण वाढत आहेत, त्या ठिकाणांना कन्टेन्मेंट झोन घोषित करण्यात येईल. प्रत्येक दिवशी दहा हजार रुग्णांवर उपचार करण्याची सोय उपलब्ध करून दिली जात असल्याचा दावा पाण्डेय यांनी केला.
२५ रुग्ण असतील तेथे कन्टेन्मेंट झोनसीईओ डॉ. मंगेश गोंदावले यांनी सांगितले, ग्रामीण भागात आठ हजार खाटा उपलब्ध करण्याचे नियोजन असून, चाचण्यांची क्षमता हजारांपर्यंत करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. ज्या गावांमध्ये २५ पेक्षा जास्त रुग्णसंख्या आहे त्या ठिकाणी कन्टेन्मेंट झोन तयार करून मोबाइल व्हॅनद्वारा व्यक्तींच्या चाचण्या करण्यात येणार आहेत.
तालुकानिहाय नाकाबंदी सुरूपोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी गेल्या वर्षाप्रमाणे व्यूहरचना आखून तालुका नाकाबंदी करण्यात येत असल्याचे सांगितले. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. पोलिसांसोबत स्थानिक यंत्रणा जनजागृती करण्यासाठी पुढे येत आहे.