जयेश निरपळ
गंगापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिल महिन्यात सर्वाधिक २,३४६ रुग्ण आढळून आले, तर याच महिन्यात ६६ जणांनी आपला जीव गमावला आहे. धोकादायक एप्रिलनंतर मे महिन्यात रुग्णवाढीचा वेग मंदावला असला तरी, मृत्युसत्र थांबलेले नसून प्रतिदिन एक असे मृत्यूचे प्रमाण आहे.
तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाल्याने रुग्णसंख्येत वेगाने वाढ झाली. यादरम्यान अनेकांनी मिळेल त्या ठिकाणी उपचार घेतल्याने मृत्यूची नेमकी आकडेवारी अद्ययावत करण्यास आरोग्य यंत्रणेला कसरत करावी लागली. सुधारित आकडेवारीनुसार दुसऱ्या लाटेत १ फेब्रुवारीपासून आतापर्यंत १०८ दिवसांत प्रतिदिन एक याप्रमाणे १०८ रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.
पहिल्या लाटेत एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ पर्यंत (तीनशे सहा दिवसांत) २ हजार ८१९ रुग्णांपैकी ७३ जणांनी आपला जीव गमावला होता. म्हणजे पहिल्या लाटेत चार दिवसानंतर एक असे प्रमाण होते. ते आता प्रतिदिन एक असे झाले आहे. दुसऱ्या लाटेत प्रतिमहा सरासरी ३० मृत्यू होत असून, पहिल्या लाटेच्या तुलनेत हे प्रमाण चारपट वाढले आहे. यावरून कोरोनाची दाहकता लक्षात येते.
या फेब्रुवारीमध्ये ३३ रुग्ण सापडले होते, पैकी ३ तर मार्चमध्ये ७९१ पैकी १७ रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनाच्या दृष्टीने स्फोटक ठरलेल्या एप्रिल महिन्यात सर्वाधिक २,३४६ रुग्ण आढळले, पैकी तब्बल ६६ जणांना आपला जीव गमवावा लागला. मे महिन्यात रुग्णवाढीचा वेग मंदावाला असून, आतापर्यंत १,१९६ रुग्ण सापडले आहेत, मात्र २२ जण कोरोनाचे शिकार ठरल्याने नागरिकांमध्ये भीतीने वातावरण आहे.
चौकट
२१ ते ३० वयोगटातील ५ जणांचा मृत्यू
तालुक्यातील १०८ मृतांमध्ये ७२ पुरुष, तर ३६ स्त्रिया आहेत. ११ ते ५० व ५१ ते १०० वयोगटातील अनुक्रमे ३१ व ७७ जणांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे यापैकी २१ ते ३० वयोगटातील पाच जणांचा यात समावेश असून, एका १३ वर्षीय मुलाचादेखील दुर्दैवी अंत झाला आहे.
गंगापूर, रांजणगाव शेणपूंजी, वाळूज व लासूर स्टेशन येथे अनुक्रमे २६, १३, १०, १० मृत्यू झाले आहेत.