गंगापूर : कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा अधिक तीव्र असून १ फेब्रुवारीनंतर जवळजवळ प्रत्येक गावात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. तालुक्यातील १११ ग्रामपंचायतींपैकी १०० गावांना कोरोनाने विळखा घातला आहे. त्यामुळे या वाढत्या रुग्णसंख्येला आटोक्यात आणण्यासाठी लसीकरणाचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.
१ फेब्रुवारीनंतर गंगापूर शहरात सर्वाधिक २९२, तर त्याखालोखाल रांजणगाव, लासुर स्टेशन, वाळूज व भेंडाळा येथे अनुक्रमे १२४, १०७, ६४ व २३ रुग्ण आढळले. लोकसंख्येच्या मानाने मोठे व औद्योगिक क्षेत्र असूनही जोगेश्वरी गावात दुसऱ्या लाटेत केवळ ७ रुग्ण आढळले आहेत. तालुक्यातील ८८ टक्के गावांत कोरोनाचा शिरकाव झाला असून १ फेब्रुवारीनंतर एकूण ९९४ सर्वाधिक रुग्ण आढळून आले. त्यापैकी ६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात गंगापूर येथील २, तर सावंगी, माळीवाडगाव, वाहेगाव व पोटूळ येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तालुक्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे तब्बल ९९.४० आहे.
लसीकरणाचे व्हावे योग्य नियोजन
१ मार्चपासून ४५ वर्षांवरील सर्वांना लसीकरण करण्यात येत असल्याने ग्रामीण भागात लसीकरणास प्रतिसाद मिळत आहे. असे असले तरी लसीकरण कसे करून घ्यावे याबाबत अनेक संभ्रम गावपातळीवर असून ते दूर होणे आवश्यक आहे. यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांकडे कौटुंबिक माहिती उपलब्ध असून ज्येष्ठ व ४५ वर्षांवरील नागरिकांची यादी ग्रा.पं. व न.प. यांच्याकडून घेऊन पोलिओ लसीकरणाच्या धर्तीवर कोविडचे लसीकरण करावे, अशी भावना जाणकारांनी व्यक्त केली आहे. लस पूर्णपणे सुरक्षित असून जास्तीत जास्त नागरिकांनी लस घेऊन स्वतःसह आपल्या कुटुंबाला सुरक्षित करून कोरोनाला थोपविण्यास हातभार लावण्याचे आवाहन देखील आरोग्य यंत्रणेकडून वेळोवेळी करण्यात येत आहे.
फोटो :