औरंगाबाद : गेल्या वर्षभरापासून जिल्हाभरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. सुरुवातीच्या काळात शहरी भागात कोरोना रुग्ण आढळून येत होते. मात्र, कोरोनाची दुसरी लाट सुरू होताच ग्रामीण भागातही कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत आतापर्यंत तब्बल ५६० रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला असून, दिवसेंदिवस मृत्यूचे तांडव सुरूच आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील २६३ गावांनी विविध उपाययोजना करीत कोरोनाला वेशीवरच रोखले हे विशेष.
एप्रिल २०२० मध्ये जिल्ह्यात पहिला कोरोनाचा रुग्ण शहरात आढळला. त्यानंतर आरोग्य यंत्रणा कामाला लागली. कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूचा सामना करताना आरोग्य यंत्रणेला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आणि तो सामना आजही करावा लागत आहे. त्यात पूर्वीसारखी भीती मात्र कमी झाली होती. तोच २०२१ च्या फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. यात शहराबरोबरच ग्रामीण जिल्ह्यातदेखील कोरोनाचा शिरकाव झपाट्याने वाढला आहे. गंगापूर तालुक्यात सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्याखालोखाल कन्नड, पैठण, वैजापूर, औरंगाबाद तालुक्यांनी तीन हजारांचा कोरोनाबाधितांचा पल्ला गाठला आहे. तर खुलताबाद, सोयगाव, सिल्लोड या तालुक्यांतदेखील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढीस लागली आहे. आरोग्य यंत्रणेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत, तर दुसरीकडे कोरोना लसीकरणावरदेखील जोर दिला जात आहे.
ऑक्सिजनसाठी नव्वद किलोमीटरचा प्रवास
कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे आरोग्य यंत्रणेकडे त्या प्रमाणात सुविधा उपलब्ध नसल्याचे दिसून आली. अनेक तालुक्यांची आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. ऑक्सिजनचा तुटवडा, रुग्णवाहिका मिळत नाही, तर अत्यावश्यक औषधे मिळत नसल्याने गंभीर रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. सोयगाव तालुक्यातील कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन नसल्यामुळे जवळपास पन्नास ते साठ रुग्णांना औरंगाबाद शहरात तर जळगाव जिल्ह्यात रेफर करण्याची वेळ आली.
प्राणवायू न मिळाल्याने मृत्युसत्र सुरू
प्रत्येक तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन सुविधा उपलब्ध नाही. काही ठिकाणी एक-दोन व्हेंटिलेटर आहेत त्यातही दुरुस्तीची बोंबाबोब असते. अशा ठिकाणी रुग्णांची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्याला रेफर केले जाते. शहरात तो रुग्ण येईपर्यंत वाटेतच त्याचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. असे मृत्युसत्र सुरूच आहे.
तालुका एकूण रुग्ण बा. गावे. को. रो. गावे मृत्यू
फुलंब्री : १३१८ : ८४ : १८ : ४९
सोयगाव : ४०२ : ७० : १६ : २२
कन्नड : ३९९९ : १७२ : ४४ : १२५
पैठण : ३७१८ : १०६ : २९ : ५५
वैजापूर : ३६१२ : १६१ : ०७ : ७१
औरंगाबाद : ३८७२ : १०८ : २८ : ३५
खुलताबाद : ८५० : ६२ : १७ : ३७
गंगापूर : ५०६५ : १३६ : ५८ : ९०
सिल्लोड : १२२० : ८६ : ४६ : ७६
जिल्हामध्ये मृत्यूचे तांडव :
फुलंब्री : ४९
सोयगाव : २२
कन्नड : १२५
पैठण : ५५
वैजापूर : ७१
औरंगाबाद : ३५
खुलताबाद : ३७
गंगापूर : ९०
सिल्लोड : ७६