परभणी : मानव विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील रुग्णांच्या नातेवाईक़ांसाठी उभारण्यात येणाऱ्या सभागृहाचे काम दुसऱ्या वर्षीही रेंगाळले आहे. आर्थिक वर्ष संपण्यास दीड वर्षाचा कालावधी शिल्लक असताना या सभागृहाचे अर्धे बांधकामही झाले नाही. त्यामुळे मागील वर्षी वापराअभावी निधी परत गेला आणि दुसऱ्या वर्षी बांधकाम पूर्ण न झाल्याने पहिले पाढे पंचावन्न अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.जिल्ह्यातील नागरिकांचा मानव विकास निर्देशांक उंचवावा, या उद्देशाने मानव विकास मिशन अंतर्गत परभणी जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबविले जातात. जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक अन्य जिल्ह्यांच्या तुुलनेत कमी असल्याने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश या योजनेत झाला. मानव विकास मिशन अंतर्गत शिक्षण, आरोग्य अशा क्षेत्रात विशेष निधी देऊन जिल्ह्यातील नागरिकांचा मानव विकास निर्देशांक वाढविण्याचा प्रयत्न केला जातो. त्या अंतर्गतच भौतिक सुविधांसाठीही निधी उपलब्ध करुन दिला जातो. या अंतर्गतच मानव विकास मिशनच्या माध्यमातून परभणी जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी हॉल बांधण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली. मानव विकास मिशनने यावर्षासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला ८३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. या निधीतून जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी हॉल बांधण्याचे काम वेळेत पूर्ण होणे गरजेचे होते. परंतु, सद्यस्थितीला केवळ स्ट्रक्चर उभे टाकले असून दोन मजली या बांधकामाचा स्लॅब, प्लास्टर, खिडक्या, दरवाजे अशी विविध कामे अजूनही पूर्ण होणे बाकी आहेत. मार्चपूर्वी हे काम पूर्ण करणे गरजेचे आहे. परंतु, शिल्लक बांधकाम लक्षात घेता हे काम यावर्षीही मार्चपूर्वी पूर्ण होते की नाही, अशी शंका निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)
दुसऱ्या वर्षीही सा़बां़चे पहिले पाढे पंचावन्न
By admin | Published: February 18, 2016 11:33 PM