औरंगाबाद : प्रसूतीसाठी घाटी रुग्णालयात आलेल्या एका महिलेला बंद लिफ्टमुळे गैरसोयींना सामोरे जावे लागले. सर्जिकल इमारतीतील तिन्ही लिफ्ट बंद असल्याने गुरुवारी रात्री सुरक्षारक्षकांनी स्ट्रेचरवरून महिलेला थेट पाय-या चढून दुस-या मजल्यावरील प्रसूती कक्षात दाखल केले.
सदरील महिला प्रसूतीसाठी रात्री साडेदहाच्या सुमारास घाटीत दाखल झाली होती. तिला नातेवाईक प्रसूतीगृहात घेऊन जात होते. त्यावेळी पहिल्या क्रमांकाच्या लिफ्टजवळ तिला प्रसूतीकळा सुरू झाल्या. ती लिफ्ट बंद असल्याने तिला दुस-या लिफ्टकडे नेले. मात्र पुढच्या दोन व तीन नंबरच्या लिफ्टही बंद होत्या. महिला वेदनेने विव्हळत होती. हा प्रकार जवानांच्या लक्षात आला. त्यांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली.
श्यामकांत देशमुख, विठ्ठल दहीफळे, अर्जुन आडे, किरण साळुंके, पांडुरंग मैद या जवानांनी स्ट्रेचर उचलून महिलेला पायऱ्यांवरून दुस-या मजल्यावर असलेल्या प्रसूतिगृहात सुखरूप पोहचविले. जवानांनी वेळीच मदत केली नसती, तर काहीही घडू शकले असते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.