उन्मेष पाटील , कळंब‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद घेवून २४ तास कर्तव्यावर राहणाऱ्या कळंब येथील पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दूरवस्था झाली आहे़ पावसाळ्यात अनेकांच्या घराला गळती लागत असून, कालबाह्य झालेल्या इमारतीत जीव मुठीत घेवून अनेकांचा संसार सुरू आहे़कळंब पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी बार्शी रोडलगत निवासस्थान आहे़ ४० निवासस्थाने असलेल्या या वसाहतीच्या परिसरात दोन निवासस्थाने अधिकाऱ्यांसाठी आहेत़ जुन्या पोलिस ठाण्याजवळ आणखी दोन निवासस्थाने अधिकाऱ्यांसाठी आहेत़ बार्शी रोडलगत पोलिस उपविभागीय अधिकारी कार्यालय सुरू झाल्यानंतर या भागातील पोलिस वसाहतीजवळ नवीन सहा निवासस्थाने बांधण्यात आली़ या सहा निवासस्थानांची परिस्थिती चांगली आहे़ मात्र, ४० वर्षांपूर्वी बांधलेल्या इतर निवासस्थानांची अवस्था खूपच बिकट झाली आहे़ वारंवार केवळ डागडुजी करून अडचण दूर करण्याचा प्रयत्न केला जातो़ अधिकारी, कर्मचारी कामावर गेल्यानंतर घरात व परिसरात महिलांना जीव मुठीत घेवूनच वावरावे लागते़पोलिस निवासस्थान परिसरात उंदिर, घुशी मोठ्या प्रमाणात आहेत़ अनेक निवासस्थानांना घुस लागल्याने भिंती खिळखिळ्या झाल्या आहेत़ तर परिसरातील घाणीमुळे सापांचाही वावर वाढला आहे़ त्यामुळे कुटुंबातील प्रत्येकाला जीव मुठीत घेवूनच रात्रंदिवस येथे रहावे लागत आहे़पडक्या भिंती अन् तुटलेले दरवाजे४या निवासस्थानाच्या भिंतीही बऱ्याच ठिकाणी पडल्या आहेत़ दरवाजे, खिडक्यांचीही परिस्थिती वेगळी नाही़ घरांच्या पाठीमागे असलेल्या भिंती तर ढासळून गेल्या आहेत़ काही ठिकाणी भिंतीच्या जागेवर मोठी झाडे उगवली आहेत़ दरवाजांना अनेक ठिकाणी लाकडी पट्या ठोकून वापरले जात आहे़ पावसात छताला ठिकठिकाणी गळती लागत असल्याने महिलांची मात्र, वर्षानुवर्षे कसरत सुरू आहे़कळंब पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी बांधलेली निवासस्थाने ही कालबाह्य झालेली आहेत़ मात्र, बांधकाम विभागाकडून वारंवार येथे डागडुजीच्या नावाखाली वायफळ खर्च करण्यात येतो़ डागडुजीनंतर काही दिवसांच्या कालावधीत परिस्थिती पूर्ववत होते़ या परिसरातील घाण पाणी बाहेर जाण्यासाठी नाल्यांसह पाणीपुरवठ्यासाठी विंधनविहिरींची आवश्यकता असून, त्यावर खर्च होण्याची गरज व्यक्त होत आहे़नवीन निवासस्थानाचे प्रस्ताव पाठविले४पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी ७० नवीन निवासस्थाने बांधकामाबाबत वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविण्यात आले आहे़ त्यासाठी वारंवार पाठपुरावा सुरू असून, आवश्यक ती जागाही उपलब्ध असल्याची माहिती कळंब पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत सावळे यांनी दिली़
पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची सुरक्षा धोक्यात
By admin | Published: August 27, 2014 1:18 AM