औरंगाबाद : मराठा आरक्षण बंददरम्यान वाळूज उद्योगनगरीतील कारखान्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली. या भयावह घटनेमुळे उद्योजकांनी कारखान्याच्या सुरक्षेवर भर दिला आहे. अनेक छोट-मोठ्या कारखान्यांसमोर खाजगी बाऊंसरसह अतिरिक्त सुरक्षारक्षक व पोलीस पहारा देत असल्याचे लोकमत टीमने केलेल्या पाहणीत दिसून आले.
तोडफोडीच्या घटनेमुळे उद्योजकांसह पोलीस प्रशासनानेही कारखान्याच्या सुरक्षेवर अधिक भर देण्यास सुरुवात केली आहे. आंदोलनाची धग कमी झाली असली तरी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उद्योजकांनी कारखान्याच्या अंतर्गत भागासह आवारात उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, बाऊंसर, तसेच अतिरिक्त सुरक्षारक्षक नेमून सुरक्षा वाढविली जात आहे. पोलीस प्रशासनाकडूनही मोठ्या कारखान्याला (विशेषत: केमिकल आणि प्लास्टिक) सुरक्षा दिली जात आहे. तसेच पोलिसांनी औद्योगिक क्षेत्रात येणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर अनोळखी व्यक्तीला प्रवेशबंदी केली असून, ओळखपत्राशिवाय प्रवेश दिला जात नाही. यासाठी काही खास व्यक्तींची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
तोडफोडीच्या घटनेनंतर कारखान्यात सुरक्षेच्या दृष्टीने काय उपाययोजना केल्या जात आहेत. याची लोकमतच्या टीमने सोमवारी (दि.१३) पाहणी केली असता उद्योगनगरीतील स्टरलाईटसमोर अतिरिक्त सुरक्षारक्षकासह खाजगी बाऊंसर व एसआरपीचे जवान, कॅनपॅकसमोर सुरक्षारक्षकासह आयआरबीचे जवान पहारा देत आहेत. इतर कारखान्यांतही गेटसमोरील सुरक्षारक्षकांत वाढ झाल्याचे दिसून आले. काही कारखान्यांच्या सुरक्षा अधिकाऱ्याशी चर्चा केली असता त्यांनी भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर लोकमत टीमशी बोलताना सांगितले.
एमआयडीसी प्रशासनाने केली कंपन्यांची पाहणीवाळूज येथील तोडफोड झालेल्या कंपन्यांची एमआयडीसी प्रशासनाने पाहणी केली. वरिष्ठ कार्यालयास अहवाल देण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.वाळूज महानगरात व्हेरॉक, इंडुरन्स, स्टरलाईटसह ६० पेक्षा अधिक उद्योगांवर जमावाने हल्ले आणि दगडफेक केल्याच्या घटना घडल्या. या घटनेनंतर ‘एमआयडीसी’चे प्रादेशिक अधिकारी सोहम वायाळ यांच्यासह उपअभियंता आणि अधिकाऱ्यांनी कंपन्यांना भेट देत तोडफोडीची पाहणी केली. या पाहणीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर केला जाणार आहे. बंदच्या कालावधीत प्रथमच अनेक कंपन्यांची तोडफोड करण्यात आली. कंपन्यांबरोबर ‘एमआयडीसी’च्या अग्निशमन वाहनाची जाळपोळ करण्यात आली. हा अहवाल वरिष्ठांना दिला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पोलिसांकडूनही पहारा; राज्य राखीव दलाचे जवान तैनातऔद्योगिकनगरीत अप्रिय घटना टाळण्यासाठी तसेच संशयित गुन्हेगारावर पाळत ठेवण्यासाठी पोलीस तैनात केले आहेत. सोमवारी (दि.१३) धनगर समाजातर्फे आरक्षणासाठी आंदोलनाचा इशारा दिल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासनाने औद्योगिक क्षेत्रातील वेगवेगळ्या ७ ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. कोलगेट चौक, कार्तिकी हॉटेल, रुचा कंपनी, साजापूर फाटा, रांजणगाव फाटा, जोगेश्वरी प्रवशेद्वार व घाणेगाव प्रवेशद्वार या ठिकाणी २ पोलीस कर्मचारी व विशेष पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे.