औंधकर म्हणाले की, ही एक अद्भुत आणि प्रेक्षणीय खगोलीय घटना असून, पिधान युती म्हणजे एक प्रकारचे ग्रहणच असते. ज्यावेळी चंद्र आकाशातील एखाद्या तेजस्वी ताऱ्यासमोरून किंवा ग्रहासमोरून जातो, त्यावेळी तो तारा किंवा ग्रह चंद्राच्या मागे काही काळासाठी लपला जातो. यालाच ‘पिधान युती’ म्हणतात. पिधान युती अनेकदा होते, पण आपल्या भागातून दिसण्याचा योग खूप वर्षानंतर आला आहे.
पिधान युती महाराष्ट्रासह संपूर्ण भारत, नेपाळ व तिबेट, बांगलादेश या भागातून दिसेल. यावेळी मंगळ ग्रहाची तेजस्विता १.५ इतकी असणार आहे आणि चंद्राच्या उत्तर दिशेला ब्रह्महृय हा तेजस्वी ताराही दिसेल. मुंबईच्या वेळेनुसार मंगळ ग्रह चंद्राच्या सावलीकडील भागातून सायंकाळी ०५:३१वा. चंद्राच्या पाठीमागे लपण्यास सुरुवात करेल. साधारण दोन तास मंगळ चंद्रामागे दडणार आहे. यावेळी सूर्य मावळलेला नसल्याने ही घटना नुसत्या डोळ्यांनी दिसणार नाही. दुर्बीण किंवा द्विनेत्री वापरून ही घटना पाहता येईल, असेही औंधकर यांनी सांगितले.