संजय लव्हाडे , जालनापावसाळा सुरू झाल्यामुळे बी-बियाणांच्या व्यापाऱ्यांनी जय्यत तयारी केली आहे. मात्र, बियाणांना ग्राहकी म्हणावी तशी नाही. सोयाबीन बियाणांना बऱ्यापैकी मागणी आहे. किराणा व धान्य मालाच्या किंमतीतही मंदीच आहे. सोने-चांदीमध्येही ग्राहक तसेच सराफा व्यापारी सावधपणे व्यवहार करीत आहेत.पावसाच्या आशेने शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी नांगरून ठेवल्या आहेत. व्यापाऱ्यांनी विविध प्रकारची बियाणे दुकानात आणून ठेवली आहेत. सध्या या बियाण्यांना मागणी नसली तरी मान्सूनच्या पावसाने हजेरी लावताच बियाणे बाजारात मोठी गर्दी निश्चितच होईल, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांतून व्यक्त होत आहे.यावर्षी सोयाबीन बियाणांना बऱ्यापैकी मागणी आहे. बहुतांश बियाणांची विक्री पाकीटावरील छापिल किमतीपेक्षा २५ ते ५० रुपये कमी दराने होत असल्याचे सांगितले जाते. सोयाबीन बियाणांच्या पाकिटाची किंमत २१०० ते २३०० रुपये आहे. बहुतांश धान्याची आवक दिवसेंदिवस कमी होत आहे. ज्वारीची आवक दररोज ८०० पोते इतकी असून शंभर रूपयांची मंदी आल्यामुळे १०५० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल असे दर आहेत. गव्हाच्या दरातही ५० रुपयांची मंदी आली असून, भाव १३०० ते २३०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. बाजरी आणि तुरीच्या दरात प्रत्येकी शंभर रुपयांची मंदी आली आहे. बाजरीचे भाव १०५० ते १४०० रुपये तर तुरीचे भाव ३५०० ते ४४०० रुपये असे आहेत. सोयाबीनची आवक दररोज २०० पोते इतकी असून ४०० रुपयांची मंदी आल्यामुळे भाव ३९०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत.असे आहेत बाजारभाव...खोबऱ्याच्या दरात २ हजार रुपयांची मंदी आली असून भाव १३००० ते १५००० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. मूगडाळ एक हजार रुपयांनी स्वस्त झाली असून, भाव ७५०० ते ८२०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. हरभरा डाळ ३००० ते ३२००, तुरडाळ ४९०० ते ६४००, मसुरडाळ ६३०० ते ५४००, उडीद डाळ ६५०० ते ७०००, शेंगदाणा ५५०० ते ६५००, साबुदाणा ६१०० ते ६७००, साखर ३०७० ते ३२००, सोयाबीन तेल ६८००, सरकी तेल ६५५०, पामतेल ६०५०, रवा कट्टा १००० ते १०५०, मैदा ९५० ते ८७०, वनस्पती तुप ९५० ते ९८०, खोबरा तेल २२०० ते २४०० प्रतिडबा असे आहेत.
बियाणे व्यापारी शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेत
By admin | Published: June 10, 2014 12:19 AM