उस्मानाबाद : यावर्षी खरीप हंगामासाठी मुबलक प्रमाणात बी-बियाणे, खत उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांना थेट बांधावर बी-बियाणे, खत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री दिवाकर रावते यांनी दिली. तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा येथे रविवारी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या कामाची पाहणी त्यांनी केली. यावेळी नाला खोलीकरण सरळीकरण कामात साचलेल्या पाण्याचे जलपूजन करण्यात आले. त्यानंतर अपसिंगा येथील ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी खा. रवींद्र गायकवाड, माजी आ. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल खोचरे, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, प्रभारी जिल्हाधिकारी अविनाश पाठक, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगूलवार, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता थोरात, विभागीय वन अधिकारी राजेश्वर सातेलीकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शीतलकुमार मुकणे, जिल्हा सहकारी निबंधक कैलास वाबळे, उपविभागीय कृषी अधिकारी उमेश बिराजदार, तुळजापूरचे तहसीलदार दिनेश झांपले, सुजित नरहरे, तालुका कृषी अधिकारी एस. पी. जाधव, अपसिंग्याचे सरपंच तोडकरी, उपसरपंच सचिन जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री रावते म्हणाले की, जलयुक्त शिवार योजनेच्या झालेल्या कामात गाळ साचला असेल तर तो गाळ काढून घ्या. यावेळी त्यांनी मागेल त्याला शेततळ्याचे किती कामे झाले किती लोकांनी मागणी केली होती याचा आराखडा घेऊन अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला.(प्रतिनिधी)
बियाणे, खत थेट बांधावर देणार
By admin | Published: April 30, 2017 11:53 PM