सोयगाव (औरंगाबाद ): नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमध्ये तालुक्यातील २२ गावांची निवड करण्यात आली आहे. दुष्काळग्रस्तांना आधार मिळावा, तसेच पाणी व जमिनीची पोत सुधारण्यासोबतच लहान व मध्यम शेतकऱ्यांचा विकास साधल्या जावा, असा या योजनेचा उद्देश आहे. या गावात ग्रामसभांच्या माध्यमातून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
या योजनेसाठी तालुक्यात अठरा ग्रामपंचायतींच्या बावीस गावात या योजनेचा डंका वाजविण्यात येत आहे. ग्रामकृषी संजीवनी समिती स्थापन करण्यात येऊन या समितीच्या मंजुरीने शेतकऱ्यांना लाभ देण्यात येईल. सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष राहणार असून वैयक्तिक लाभाच्या योजनेत फळबाग, शेडनेट, पॉली हाऊस, बंदिस्त शेळीपालन, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, मधुमक्षिका पालन, मत्स्यपालन, गांडूळखत व नादेप युनिट, शेततळे, तुषार, ठिबक, कांदाचाळ, सिमेंट बांधारे, मातीनाला बांध आदी कामांचा या योजनेत समावेश आहे.