वाळूज महानगर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्षपदी अतुल शिवाजी राऊत यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख, शहर जिल्हाध्यक्ष विजय साळवे यांनी नुकतेच अतुल राऊत यांना नियुक्तीचे पत्र दिले.
फोटो क्रमांक- अतुल राऊत
-----------------------
बजाजनगरात दारु विक्री करणारा पकडला
वाळूज महानगर : बजाजनगरात अवैधरित्या देशी दारुची चोरून विक्री करणाऱ्या गणेश पाडे (रा.वडगाव परिसर) यास एमआयडीसी वाळूज पोलिसांनी सोमवारी पकडले. आरोपीच्या ताब्यातून अडीच हजार रुपये किमतीच्या ४८ देशी दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. बजाजनगरातील महाराणा प्रताप चौकात एक इसम अवैधरित्या देशी दारुची विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा मारुन ही कारवाई केली.
-------------------------
जोगेश्वरी रोडवर कचरा
वाळूज महानगर : रांजणगावातून जोगेश्वरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर कचरा पडल्याने ये-जा करणाऱ्यांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. या भागातील एकतानगर-कृष्णानगर वसाहतीतील नागरिक रस्त्याच्या कडेला केर-कचरा टाकतात. या कचऱ्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत असून नागरिक व वाहनधारकांना नाक दाबूनच ये-जा करावी लागते. उघड्यावर कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी जितेंद्र वाघमारे, विक्की शेजवळ, कानिफनाथ थोरात आदींनी केली.
-----------------------------
लोडिंग रिक्षासाठी जागा द्या
वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीतील मालाची ने-आण करणाऱ्या लोडिंग रिक्षा उभ्या करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी चालकांतून होत आहे. औद्योगिक क्षेत्रात पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसल्याने रिक्षा चालक कारखान्यासमोरील मोकळ्या जागेवर लोडिंग रिक्षा उभ्या करतात. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. लोडिंग रिक्षा चालकांना रिक्षा उभ्या करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी शेख रफीक, सुखदेव काळे, सुहास शिंदे आदी चालकांनी केली आहे.
------------------------------
दत्तनगर फाट्यावर अतिक्रमण
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील दत्तनगर फाट्यावर अतिक्रमणे वाढल्याने ये-जा करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या फाट्यावर दारूच्या दुकानासमोर हातगाड्यांवर व्यवसाय करणाऱ्यांनी ठाण मांडले आहे. या हातगाड्यांवर ग्राहकांची मोठी गर्दी होत असल्याने वाहतुकीस खोळंबा होतो. एमआयडीसी प्रशासनाकडून अतिक्रमणावर कारवाई होत नसल्याने या फाट्यावरुन ये-जा करणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
--------------------------