औरंगाबाद : पोलिसांच्या मुलांना शांतपणे अभ्यास करण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, तसेच पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी औरंगाबाद ग्रामीण पोलीस मुख्यालयाजवळ कॉलनीत अभ्यासिका सुरू करण्यात आली. ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी याकरिता पुढाकार घेतला.
औरंगाबाद ग्रामीण पोलीस मुख्यालयात उभारण्यात आलेल्या अभ्यासिकेत एकाच वेळी ४० जणांना बसण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुण, तरुणींना विना अडथळा अभ्यास करता यावा, यासाठी उत्तम प्रकाश व्यवस्था या अभ्यासिकेत आहे. तेथे खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना तेथे अभ्यास करता येणार आहे. याकरिता तेथे स्पर्धा परीक्षेशी संबंधित पुस्तके ठेवण्यात आली. ही अभ्यासिका नुकतीच खुली करण्यात आली. या अभ्यासिकेसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहूल, पूजा गायकवाड, पोलीस निरीक्षक भागवत फुंदे, राखीव निरीक्षक संजय निर्मळ, सहायक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे, सहायक उपनिरीक्षक विजय मारकळ, लक्ष्मण पांढरे, विनोद पदमणे, पांडुरंग शिंदे, आशा बांगर यांनी परिश्रम घेतले.