पैठण : जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या जलविद्युत प्रकल्पाच्या सांडव्यावर मोबाईलच्या कँमेऱ्यातून सेल्फी घेण्याचा मोह पैठण शहरातील एका शालेय विद्यार्थ्याचा जीवावर बेतला आहे. सेल्फी घेताना तोल जाऊन सांडव्याच्या पाण्यात बुडून आज दुपारी १५ वर्षीय मुलगा मरण पावला. विनायक सुरेश बाबर ( रा. जैनपुरा पैठण ) असे बुडून मरण पावलेल्या मुलाचे नाव आहे. विशेष म्हणजे तो परिवारात एकुलता एक मुलगा होता. या दुर्दैवी घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
शनिवारी दुपारी दोन वाजता जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी मित्रासह सेल्फी घेत असताना जलविद्युत केद्राजवळ ही घटना घडली.जलविद्युत प्रकल्प सुरू असल्याने सांडव्यातून गोदावरी पात्रात पाणी सुटलेले होते. जैनपुरा पैठण येथील विनायक बाबर आपल्या दोन मित्रासह आज दुपारी एक वाजेच्या दरम्यान घराबाहेर पडला. संत ज्ञानेश्वर उद्यानात जाऊन तेथे मित्रासह विनायकने फोटो काढले यानंतर त्यांनी जायकवाडी धरणावर जाऊन फोटो काढण्याचा निर्णय घेतला. जलविद्युत प्रकल्पातून पाणी सोडण्यात आल्याने गोदावरीपात्र भरून वहात होते. अशातच सांडव्याच्या काठावर उभे राहून सेल्फी घेण्याचा मोह विनायकला झाला. जलविद्युत प्रकल्पाच्या सांडव्याच्या काठावर उभे राहून सेल्फी घेताना दुर्दैवाने विनायकचा तोल जाऊन तो पाण्यात पडला. पाण्याचा वेग जास्त असल्याने पाण्यात पडल्यानंतर तो परत दिसलाच नाही असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. विनायक पाण्यात पडताच त्याच्या मित्रांनी घटनास्थळावर मोठा आरडाओरडा केल्याने मोठ्यासंख्येने नागरिक तेथे जमा झाले. साठेनगरातील तरूणांनी पाण्यात उडी मारून विनायकचा शोध घेतला परंतू तो मिळून आला नाही.
खबर मिळताच पैठण नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाचे पथक तेथे दाखल झाले. जलविद्युत प्रकल्पातून पाणी बंद करण्यात आले, पाणी कमी झाल्यानंतर अग्निशमन पथकाला विनायकचा मृतदेह दुपारी ३ वाजेच्या दरम्यान आढळून आला.पैठण नगर परिषद कर्मचारी सुरेश बाबर यांचा विनायक एकुलता एक मुलगा होता.