कायगाव (औरंगाबाद ) : कायगाव भागातील सुमारे दोनशे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उसाचे हप्ते थकविल्याने अहमदनगर जिल्ह्यातील यूटेक शुगरला मालमत्ता जप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे. बुधवारी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबत आदेश काढल्याने कायगाव परिसरातील शेतकऱ्यांचे ७ महिन्यांपासून अडकलेले सुमारे २ कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गेल्या ऊस हंगामात गंगापूर तालुक्यातील कायगाव, भिवधानोरा, अगरवाडगाव, धनगरपट्टी, पखोरा आदीसह परिसरातील सुमारे २०० ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील युटेक शुगर लि. संगमनेर या साखर कारखान्याला सुमारे १० हजार मेट्रीक टन ऊस दिला होता. या काळात इतर जवळपास सर्वच साखर कारखान्यांनी तोडलेल्या उसाचे पेमेंट शेतकऱ्यांना वाटप केले. मात्र, यूटेक शुगरकडून जानेवारी महिन्यापासून उसाचे पेमेंट देण्यासाठी टाळाटाळ केली जात होती. वास्तविक, शेतकऱ्यांच्या शेतातून ऊस तोडून नेल्यानंतर १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना त्याचे पैसे देणे आवश्यक असतांना ७ महिने उलटूनही कारखान्याकडून पेमेंटचे वाटप करण्यात आले नव्हते. त्यामुळे शेकडो शेतकरी अडचणीत सापडले होते.याबाबत शेतकऱ्यांनी अनेकदा कारखाना प्रशासन आणि साखर आयुक्तांकडे तक्रार केली होती. मात्र, शेतकऱ्यांचा प्रश्न सुटला नव्हता.
बुधवारी प्रहार शेतकरी संघटनेचे भाऊसाहेब शेळके, रामकीसन औटे, संभाजी चव्हाण, कडूबाळ चव्हाण, गणेश पाठे, संतोष लहाने, सुरेश खैरे आदींसह शेतकऱ्यांचे एक शिष्टमंडळ थेट पुण्यातील साखर आयुक्तालयात धडकले. यूटेक शुगरकडे अडकलेले पैसे मिळावे यासाठी साखर कारखान्याचा आगामी गळीत हंगाम परवाना रद्द करून, कारखान्याची मालमत्ता जप्त करावी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे वाटप करावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी तात्काळ याबाबतचे आदेश निर्गमित केले.
अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेशकारखान्याला महसूल वसुली प्रमाणपत्र (आरआरसी) नोटीस बजावण्यात आली. याअंतर्गत युटेक कारखान्याची जमीन महसुलाची थकबाकी समजून कारखान्याने उत्पादित केलेल्या साखर आणि इतर उत्पादनाची विक्री करून या रक्कम वसूल करण्याचे आदेश अहमदनगरच्या जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. सन २०१९-२० या हंगामातील उसाचे थकीत एफआरपी नुसार प्रति मेट्रीक टन २१६६.४६ प्रमाणे १५ टक्के व्याजासह देण्याचे आदेश दिले आहे.